ढगाळ वातावरण, पाऊस अन् धुक्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हैराण

जायखेडा (नाशिक) : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात सुधारणा झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र तीन दिवसांपासून दिवसभर ढगाळ वातावरण आणि पावसाची हलकी रिपरिप, पहाटेच्या वेळेस दाट धुके व दवबिंदू पडत आहेत. यामुळे लाल कांदा पिकावर व उन्हाळ कांद्याच्या रोपांवर करपा व मररोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे. महागड्या औषधांची फवारणी करून शेतकरी पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. 

ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसाने शेतात असलेले कांदापीक व उन्हाळ कांद्याची रोपे जास्त पाण्यामुळे मृत पावली. तसेच गेल्या वर्षीचा कांदाही संपत आल्यामुळे लाल कांद्यास तीन ते चार हजार रुपयांचा बाजारभाव मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या धुक्यामुळे व दवबिंदूंमुळे कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला असून, पिकाची वाढ खुंटली आहे.

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ

बागलाण तालुक्यात नगदी पीक म्हणून कांदालागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. साधारणत: पोळ्यापासून या भागात कांदालागवडीस प्रारंभ होतो. मात्र लागवड केलेला कांदा ऑक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसाने पूर्णपणे सडला. कांदालागवडीसाठी शेतकऱ्यांनी एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च केला. पण परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते केल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. उंच व मुरमाड जमिनीत असलेला थोडाफार कांदा वाचला. मात्र सध्या रात्री धुके व पहाटे दवबिंदू तसेच दिवसभर ढगाळ वातावरणामुळे त्यावर करप्याचा प्रादुर्भाव होत आहे. आधी लावलेल्या कांदापिकाची वाढ खुंटली आहे. कांदापात पिवळी पडत असल्याने शेतकरीवर्ग हैराण झाला आहे. रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागत असल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढू लागला आहे. 

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ

यंदा खूप महागडे कांद्याचे बियाणे घेऊन टाकले. पण जास्त पाण्यामुळे मररोग आल्याने बियाणे कमी प्रमाणात उगले, तर काही संपूर्ण वाया गेले आणि आता जे काही आहे त्याची धुके व दवबिंदूंमुळे मर होत आहे. 
-वैभव शेवाळे, शेतकरी, जायखेडा