तक्रारदारच निघाला सूत्रधार! पंधरा लाखांची चोरी करणारे अटकेत; २४ तासांत चोरीचा बनाव उघड 

जुने नाशिक : चारचाकी गाडीची काच फोडून त्यातून पंधरा लाखांची रक्कम चोरी करणाऱ्या टोळीस मुंबई नाका पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली. मात्र, तपासात हा सर्व प्रकार बनाव असल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे तक्रारदार हाच गुन्ह्यातील मुख्य संशयित निघाला. वाचा सविस्तर

शुक्रवारी (ता. ५) मुंबई नाका परिसरातील छान हॉटेलसमोर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चारचाकी वाहनाची काच फोडून सुमारे पंधरा लाखांची रक्कम लंपास केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात मयूर भालेराव (२५, रा. तिवंधा चौक) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

नेमके घडले काय?

घटनेची गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी चोरट्यांच्या शोधार्थ पथके तयार करत गुन्ह्याचा तपास सुरू केला. घटनास्थळावरील परिस्थिती बघता प्राथमिक माहितीनुसार घडलेला प्रकार बनावट असल्याची चर्चा पोलिस ठाण्याच्या आवारात सुरू होती. पोलिसांनी तपासाच्या दृष्टीने घटनास्थळी जाऊन साक्षीदारांशी चर्चा केली. तसेच, तक्रारदार मयूर भालेराव यांचा इतिहास काढण्यास सुरवात केली असता मयूर रौलेट जुगार चालविणारा कैलास शहा याच्याकडे काम करत असल्याचे समजले. या वेळी पोलिसांनी सखोल चौकशी केली असता कैलास शहा यांच्याशी असलेल्या मागील भांडणाचा राग काढण्याच्या दृष्टीने मयूरने आपल्या साथीदारांसह पंधरा लाख रुपये चोरीचा कट रचला. यासाठी त्याने कैलास शहा यांचे बांधकाम व्यवसायातील भागीदार संदीपसिंग सलोजा यांनी दिलेली रक्कम साथीदार रामा शिंदे यांच्या मदतीने परस्पर लांबविली. याप्रकरणी पोलिसांनी मयूर भालेराव व रामा शिंदे या दोघांनाही ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून पंधरा लाख रुपयेदेखील हस्तगत केले. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच