Site icon

तक्रारी माझ्याकडे करतात, मतदान त्यांना का करतात? राज ठाकरे यांचा शेतकऱ्यांना सवाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर असून रविवारी (दि.२१) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अडचणी मांडल्यानंतर ‘अडचणीच्या काळात तुम्ही मला भेटायला येतात आणि मतदान पिळवणूक करणाऱ्यांना का करता?’ असा प्रश्न राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना विचारला. त्यावेळी आम्ही तुमच्यासोबत आहोत असे शेतकऱ्यांनी विचारले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले.

नाशिकच्या दौऱ्यावर राज ठाकरे आले असून त्यांनी रविवारी शेतकरी बांधव, क्रेडाई संघटनेचे पदाधिकारी, वास्तुविशारद संघटनेचे पदाधिकारी व पक्षाच्या ग्रामीण पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. सुरुवातीस शेतकऱ्यांनी ठाकरे यांच्याकडे समस्या मांडल्या. जिल्हा बँक सक्तीने कर्ज वसुलीचा तगादा लावत असल्याची कैफियत जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे मांडली. ‘तुम्ही मतदान मला करत नाहीत. मग अडचणीच्या वेळी माझ्याकडे कशासाठी येतात? असा अनपेक्षीत सवाल ठाकरे यांनी केल्याने शेतकरी गडबडले. आम्ही तुमच्यासोबतच राहू अशी ग्वाही ठाकरे यांना देत जिल्हा बँकेच्या त्रासातून आम्हाला सोडवा अशी विनंती शेतकऱ्यांनी केली. आम्ही कर्ज भरण्यास तयार आहोत. परंतु त्यासाठी वेळ मिळायला हवा अशी अपेक्षा त्यांनी ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली. त्यावेळी ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत शेतकरी मतदान करीत नसल्याबद्दलची नाराजी व्यक्त केली. ज्यांनी महाराष्ट्राला टोलमुक्त करू असे आश्वासन दिले, त्यांना तुम्ही मतदान केले का? तसे न करता जे तुमची पिळवणूक करता त्यांनाच तुम्ही मतदान केल्याची नाराजी ठाकरे यांनी स्पष्ट बोलून दाखविली. मतदान करताना आपण ते कुणाला करीत आहोत याचे भान ठेवायला हवे, असेही सुनावले. शेतकऱ्यांनी ठाकरे यांचे म्हणणे ऐकून घेतले. ‘शेतकरी यापूढे तुमच्यासोबत असतील असे आश्वासन उपस्थित शेतकऱ्यांनी यावेळी ठाकरेंना दिले. येत्या तीन – चार दिवसांत शेतकरी प्रतिनिधीना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांची या विषयावर भेट घेऊ अशी ग्वाही ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिली.

मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी पदाचा राजीनामा पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे सादर केला आहे, मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. राज ठाकरे यांच्या दौऱ्यात शहराला नवीन शहराध्यक्ष मिळेल अशी चर्चा रंगली होती. मात्र, राज ठाकरे यांनी कुठलेही संघटनात्म फेरबदल केले नाही. त्यामुळे पुढील दौऱ्यात नवीन पदाधिकारी मिळणार का, याकडे पक्षातील पदाधिकाऱ्यांचे लक्ष आहे.

हेही वाचा :

The post तक्रारी माझ्याकडे करतात, मतदान त्यांना का करतात? राज ठाकरे यांचा शेतकऱ्यांना सवाल appeared first on पुढारी.

Exit mobile version