तब्बल आठ महि़न्यानंतर घंटेचा नाद! मंदिरात दर्शन घ्या पण नियम पाळूनच

नाशिक : तब्बल आठ महिन्यांपासून बंद असलेल्या मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे सोमवारी (ता. १६) उघडणार आहेत. आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर, साडेतीन शक्तिपिठांपैकी असलेले वणी येथील श्री सप्तशृंगदेवी मंदिर, श्री काळाराम, चांदवड आणि देवळाली कॅम्प येथील श्री रेणुका मंदिर, शहरातील भद्रकाली आणि कालिका मंदिर यांसह डझनभर अधिक मंदिरांत रविवारी (ता.१५) दिवसभर साफसफाई व खबरदारी उपाययोजनांची तयारी सुरू होती. 

आठ महिन्यांनंतर मंदिरांचे कवाड उघडली
शहर जिल्ह्यात १८ मार्चपासून कोरोना लाॅकडाउनमुळे मंदिर बंद आहे. त्यामुळे मंदिरांवर अर्थकारण अवलंबून असणाऱ्या धार्मिक गावांचे अर्थचक्र थांबले आहे. साडेतीन शक्तिपिठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगीगडावरील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी संस्थान, त्र्यंबकेश्‍वर देवस्थानसह विविध विश्‍वस्त संस्थांतर्फे भाविकांना मंदिरात प्रवेश देण्याचे नियोजन झाले. एप्रिल महिन्यातील आदिमायेचा चैत्रोत्सव, त्यानंतर त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर दरम्यानची संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची दिंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व कावडयात्रा (कोजागरी पौर्णिमा उत्सव) यांसह गावोगावचे यात्रोत्सव रद्द झाले. त्र्यंबकेश्वरला पितृपंधरवड्यात त्रिपिंडी आणि नारायण नागबलीसाठी देशभरातील पर्यटकांचा राबता थंडावला. श्रावण महिना तसाच कोरडा गेला. ब्रह्मगिरीच्या फेरीला प्रतिबंद होता; मात्र सोमवारपासून आता नियम पाळून पूजाविधी सुरू होणार असल्याने अर्थकारणावर अवलंबून गाव-शहरांची झालेली आर्थिक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. 

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

त्र्यंबकराजाच्या मंदीरात.. 
- मंदीरात १ हजार भाविकांनाच मिळणार मंदीर प्रवेश 
- एक तासाला ८० भाविकांना मिळू शकेल दर्शन 
- दर्शन होईपर्यत इतरांना मंदीरात प्रवेश मिळणार नाही 
- पुर्व दरवाजातून बाहेरील तर उत्तर दरवाजातून ग्रामस्थांना प्रवेश 
- महाद्वाराच्या डाव्या बाजूला हातपाय धुउन प्रवेशाची सोय 
- सभामंडपात बसून कुणीही पुजा करु शकणार नाही 
- देवस्थान वस्तू मुर्तीना हात लावून स्पर्शला प्रतिबंध 
- प्रसाद,तीर्थ अंगारा या वस्तूचा लाभ मिळणार नाही 

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात 

अदिमायेच्या गडावर... 
- भगवती मंदिरात प्रवेशासाठी मास्कचा वापर बंधनकारक 
- सोशल डिस्टन्सिंगसाठी दर्शन मार्गावर चिन्हांकित आखणी 
- मंदिर मार्गावर थर्मल गन, ऑक्सिमीटर, सॅनिटायझर स्टॅन्ड 
- मंदिराच्या आवारात भाविकांना हात धुण्याच्या सुविधा 
- भाविकांनी गर्दी टाळत काळजी घेण्याचे आवाहन 

मंदिरांच्या शहरात उत्साह 
पंचवटी - मंदिरांचे शहर, अशी ओळख असलेल्या नाशिक शहरात काळारामासह कपालेश्‍वर, सीतागुंफा आदी मंदिरांची साफसफाई सुरू होती. संसर्गाचा प्रादुर्भाव अन् गर्दी होण्याच्या शक्यतेने राज्य शासनाने देवस्थानबाबतची नकारघंटा कायम ठेवली होती. मात्र मास्कसह अन्य शिस्त पाळण्याच्या अटींवर सोमवारी पाडव्याच्या धर्तीवर सर्व देवस्थाने खुली होत आहेत. 

रामकुंडावर गजबज 
औद्योगिकनगरी अगोदर धार्मिकनगरी ही नाशिकची ओळख आहे. प्रभू रामचंद्रांनी सीता व बंधू लक्ष्मणासह पंचवटी परिसरात व्यतीत केलेला चौदा वर्षांचा काळ, वडील दशरथ यांचा रामकुंडावर केलेला श्राद्धविधी, साक्षात शंकर महादेवाने पापक्षालनासाठी रामकुंडात केलेले स्नान, सीतागुंफा, निसर्ग सौंदर्याने नटलेले तपोवन यामुळे या भागात देशभरातील भाविकांची वर्षभर वर्दळ असते. मात्र कोरोनामुळे येथील सर्वकाही ठप्प झाले होते. मात्र, सोमवारपासून मंदिरे खुली होत असल्याने भाविकांसह देवस्थानचे विश्‍वस्त, व्यावसायिक यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

ग्रामदैवत भद्रकाली मंदिरात तयारी 
नाशिकचे ग्रामदैवत अशी बिरुदावली मिळविलेल्या श्री भद्रकाली मंदिरात भाविकांना काळजी घेऊनच प्रवेश दिला जाणार आहे. हा परिसर विशेष गर्दीचा असल्याने पूर्ण परिसर सॅनिटाइझ करण्यात आला आहे. मास्कशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरेही कार्यान्वित करण्यात आले आहेत. मंदिर उघडण्यासाठीची मंदिर देवस्थानची तयारी पूर्ण होत आल्याचे विश्‍वस्त अतुल गर्गे, पुजारी मंदार कावळे यांनी सांगितले. 

काळाराम मंदिरात साफसफाई 
श्रीमंत पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी बांधलेल्या श्री काळाराम मंदिरात वर्षभर भाविकांची मोठी वर्दळ असते. कोरोनामुळे मंदिर भाविकांसाठी बंद होते, तरीही येतील पूजाविधी नित्यनेमाने सुरू होत्या. सोमवारपासून मंदिरे खुली होणार याबाबत देवस्थानची तयारी जाणून घेतली असता, अद्याप शासनाचा लेखी आदेश प्राप्त झालेला नसल्याचे विश्‍वस्तांनी सांगितले. मात्र तरीही मंदिर परिसरात साफसफाई करण्यात आलेली आहे. मंदिरात प्रवेशासाठी मास्क आवश्‍यक असून, प्रवेशद्वारावर सॅनिटायझर्सही उपलब्ध करून देण्यात आलेला आल्याचे विश्‍वस्तांनी सांगितले. प्रवेशासाठी शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करण्यात येणार असल्याचे विश्‍वस्त मंदार जानोरकर व धनंजय पुजारी यांनी सांगितले. 

कपालेश्‍वर मंदिरात तयारी 
भगवान शंकरासमोर नंदी नसलेले एकमेव मंदिर म्हणून कपालेश्‍वर मंदिराची आख्यायिका आहे. त्यामुळे याठिकाणी शिवभक्तांची बारमाही वर्दळ असते. कोरोनामुळे सात महिन्यांपासून बंद असलेल्या या मंदिरावर मोठ्या प्रमाणावर वाढलेले झाडांची मुळे काढून टाकण्यात आली असून, रविवारी सकाळपासून मंदिराची आतून आणि बाहेरून स्वच्छता करण्यात आली. सोमवारपासून प्रवेशद्वारावर सॅनिटायझर्स ठेवण्यात येणार असून, मास्कशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, असे विश्‍वस्त ॲड. भाऊसाहेब गंभिरे यांनी सांगितले. 

सीतागुंफा देवस्थानचा सोशल डिस्टन्सिंगचा आग्रह 
श्री काळाराम, कपालेश्‍वरनंतर पंचवटीतील सर्वाधिक वर्दळीचे देवस्थान म्हणजे सीतागुंफा देवस्थान असून, याठिकाणी भाविकांची वर्षभर वर्दळ असते. याठिकाणची संभाव्य गर्दी ध्यानात घेऊन दोन भाविकांत पुरेसे अंतर ठेवण्याबरोबरच मास्कशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, तसेच सॅनिटायझर्सचा वापर करण्यात येईल, असे विश्‍वस्त महंत कविंद्रपुरी गोसावी यांनी सांगितले. याठिकाणी रविवारी दिवसभर साफसफाई करण्यात आली.