तब्बल ४२ दिवस मृतदेह ठेवला मिठात! व्हायरल व्हिडिओची चर्चा

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आल्याचा आरोप करत मयत मुलीच्या पालकांनी तब्बल ४२ दिवसांपासून मृतदेह मिठामध्ये राखून ठेवला. ही संबंधित व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. धडगांव तालुक्यातील खडक्या येथे ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. याबाबत आता वरिष्ठ पोलीस अधिकारी सक्रिय झाले असून अधिक तपास करीत आहे.

मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन करण्यात यावे तसेच जोपर्यंत संबंधित दोषींवर कारवाई होवून मयत मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही, असा पवित्रा मुलीच्या पालकांनी घेतला आहे. दरम्यान, पोलीसांनी तीन संशयितांना अटक केल्याचे सांगण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, धडगांव तालुक्यातील खडक्या येथील एका विवाहित मुलीला तालुक्यातील वावी येथील रहिवाशी व अन्य एकजण १ ऑगस्ट २०२२ ला बळजबरी गाडीवर बसवून घेवून गेला होता. त्यानंतर सदर पिडीत विवाहितेने तिच्या नातेवाईकांना दिलेल्या माहितीनूसार, वावी येथे रणजीतसह चौघेजण चित्रपटाप्रमाणे कुकर्म करीत असून तीला मारणार होते. त्या ठिकाणचे फोटोही सदर विवाहितेने नातेवाईकांना पाठविले होते. त्यानंतर तिचे कुटूंबिय वावी येथे गेले असता सदर विवाहित मुलगी ही आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली. वावी गावातील लोकांच्या मदतीने तिचा मृतदेह आंब्याच्या झाडावरून खाली उतरविला, असे तिच्या पालकांकडून सांगण्यात येत आहे.

पिडीतेवर बलात्कार झाल्याची कुटूंबियांनी माहिती दिली. मात्र शवविच्छेदन अहवालात याबाबत कुठलीही तपासणी झालेली आढळून आली नाही. आंब्याचे झाड उंच असून त्याठिकाणी ती विवाहिता कशी चढू शकते, असा प्रश्‍न कुटूंबियांनी उपस्थित केला. याबाबत पोलीसांनी सुरुवातीला आत्महत्येचा गुन्हा दाखल केला होता. तसेच वावी येथील रणजीत ठाकरे नावाच्या व्यक्तीसह तिघांना अटक केली आहे. त्या मुलीचा मृतदेह कुटूंबियांकडे अंतिम संस्कारासाठी सोपविण्यात आला होता. मात्र मुलीच्या पित्याने जोपर्यंत पिडीतेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढा देण्याचा निर्धार करत घराशेजारच्या शेतात खड्डा करून मृतदेह मिठामध्ये पुरण्यात आला. त्यानंतर कुटूंबियांसह ग्रामस्थांनी धडगांव पोलीस स्टेशनसह थेट पोलीस अधिक्षक कार्यालय गाठून आपले गार्‍हाणे मांडले. त्यानंतर पोलीस अधिक्षकांनी ग्रामस्थांची भेट घेतल्यानंतर पिडीत युवतीचे पुन्हा शवविच्छेदन करण्याची सूचना धडगांव पोलीसांना दिल्या.

माझ्या मुलीने गळफास घेवून आत्महत्या केलेली नसून तिच्यावर बलात्कार करण्यात आला असून, त्यानंतर झाडावर लटकवून हत्या करण्यात आली आहे. तिला न्याय मिळण्यासाठी तिचे पुन्हा शवविच्छेदन करण्यात यावे, जोपर्यंत पुन्हा शवविच्छेदन होत नाही. तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही.
-पिडीतेचे वडील

पिडितेच्या मृत्यूपुर्वी व्हायरल झालेल्या ऑडीओ क्लिपची तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये काही तथ्य आढळून आल्यास योग्य ते गुन्हे लावण्यात येतील. धडगांव येथील तहसीलदारांशी याबाबत पत्र व्यवहार करण्यात आला.
– श्रीकांत घुमरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहादा

हेही वाचा

The post तब्बल ४२ दिवस मृतदेह ठेवला मिठात! व्हायरल व्हिडिओची चर्चा appeared first on पुढारी.