तरण तलावावरून एकाच पक्षाच्या नगरसेवकांमध्ये वादंग; सभागृहात चांगलाच गोंधळ

सिडको (नाशिक) : सिडकोतील कामगार वसाहत असलेल्या महिला व मुलींसाठी स्वतंत्र महिला तरण तलाव बांधण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या शिवसेना नगरसेवकालाच शिवसेनेच्या एका महिला नगरसेविकेने तरण तलावास विरोध दर्शविल्याने महिला वर्गात आश्चर्य व्यक्त होत आहे. 

 प्रभाग सभेत चांगलाच गोंधळ

प्रभाग समितीची बैठक आज सभापती चंद्रकांत खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विखे-पाटील शाळेच्या शेजारी असलेल्या महापालिकेच्या जागेवर महिलांसाठी तरण तलाव बांधण्याचा प्रस्ताव प्रभाग २८ चे नगरसेवक दीपक दातीर यांनी तयार केला. मात्र, याच प्रभागातील शिवसेनेच्या नगरसेविका सुवर्णा मटाले यांनी या ठरावास विरोध दर्शविल्याने प्रभाग सभेत चांगलाच गोंधळ उडाला. शिवसेना नगरसेवकाच्या विकासकामाला शिवसेनेच्याच नगरसेविकेने केलेला विरोध यानिमित्ताने सभागृहात बघायला मिळाला. दीपक दातीर यांनी प्रभाग सभेत सभापतींच्या लेटरहेडवर याबाबतचा ठराव तयार केला आणि सभागृहातील सदस्यांच्या सह्या घेतल्या. सदस्यांनी या ठरावावर सह्यासुद्धा केल्या. मात्र, याच प्रभागातील नगरसेविका सुवर्णा मटाले यांनी यास विरोध दर्शविला. 

कुणी विरोध करण्याची गरजच नाही...

एकाच प्रभागातील एकाच पक्षाच्या नगरसेवकांमध्ये यावेळी वादंग सुरू झाल्याने अखेरीस सभापतींनी हे लेटरहेड आलेच कुठून, मलाही माहिती नसल्याचे सांगितल्याने अजूनच गोंधळ निर्माण झाला. या सर्व प्रकारानंतर नगरसेवक दातीर यांनी सभागृहत्याग करत सभागृहाबाहेर जाऊन निषेध व्यक्‍त केला. विखे-पाटील शाळेत अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही यास विरोध केला असल्याचे नगरसेविका सुवर्णा मटाले यांनी सांगितले. प्रभागातीलच महिलांसाठीच नव्हे, तर सिडकोतील कामगार वसाहतीतील महिलांसाठी हा तरण तलाव तयार होणार असून, कुणी विरोध करण्याची गरजच नसल्याचे दीपक दातीर यांनी सांगितले. 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

...तर वाद झालाच नसता 

शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आजारी असल्याने प्रभाग बैठकीला ते उपस्थित राहू शकले नाहीत. जर ते या बैठकीला उपस्थित असते, तर कदाचित शिवसेनेच्या नगरसेवकांचा हा वाद टोकापर्यंत गेला नसता, अशी चर्चा सदस्यांमध्ये ऐकायला मिळत होती.  

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल