तरुणाई : तुझी माझी जोडी.. हॉटेल-कॅफेची लागलीय गोडी

हॉटेल- www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात ठिकठिकाणी हॉटेल्स असून, त्यातील काही हॉटेल-कॅफेंमध्ये फक्त तरुण-तरुणींचाच वावर दिसतो. या हॉटेल किंवा कॅफेमध्ये तरुणवर्गास आकर्षित करण्यासाठी कॅफेचालकांकडून एकांतपणासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. त्यामुळे या ठिकाणी विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह अल्पवयीन मुला-मुलींचाही वावर वाढलेला दिसतो. एकांतवासात प्रेमाच्या लाटेवर तरंगत असलेल्या तरुणाईचे पाऊल चुकीच्या दिशेने जाण्याची भीती वर्तवली जात आहे. ही भीती पाहता याकडे पोलिस व अन्न व औषध प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर जनजीवन पूर्वपदावर आले असून, शैक्षणिक संस्था, व्यावसायिक, पर्यटन, खासगी व शासकीय कार्यालये सुरू झाली आहेत. त्याचप्रमाणे हॉटेल व्यवसायही पूर्वपदावर आला आहे. मात्र, शहरात काही हॉटेलचालकांनी ग्राहकवर्ग म्हणून फक्त तरुणाईलाच डोळ्यासमोर ठेवून हॉटेल-कॅफेंची रचना केली आहे. त्यामुळे हा ट्रेंड तरुणाईस आकर्षित करीत आहेत. त्यात आकर्षक अंतर्गत सजावट, चविष्ट खाद्यपदार्थांसह जोडप्यांना सुरक्षितता-एकांतवास देण्यास प्राधान्य दिल्याचे दिसते. त्यामुळे सकाळपासूनच या हॉटेल-कॅफेबाहेर तरुणाईच्या वाहनांची गर्दी झालेली असते तर हॉटेेल-कॅफेमध्ये आडोसा मिळवण्यासाठी तरुणाईची लगबग पाहावयास मिळते.
विशेषत: शहरातील महाविद्यालये, क्लासेस असलेल्या आजूबाजूच्या परिसरातील हॉटेल व कॅफेंमध्ये हे चित्र कायम असते. तर उपनगरीय भागांमध्येही ही संकल्पना रुजत असून, तेथेही तरुणाईची गर्दी होताना दिसते. अनेक ठिकाणी जोडप्यांना प्रायव्हसी मिळत असल्याने त्यांची पसंती संबंधित हॉटेल-कॅफेंना मिळत आहे. मात्र, या गर्दीत अल्पवयीन मुले-मुलीही दिसत असल्याने शिक्षणाच्या नावाखाली घराबाहेर पडल्यानंतर त्यांची पावले या हॉटेल-कॅफेत वळत असल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे.

यामुळे तरुणाई होते आकर्षित : 

❤️ काही हॉटेल-कॅफेमध्ये सीसीटीव्ही नाहीत. असले तरी बंद स्थितीत असतात.
❤️ रहिवासी किंवा वर्दळीच्या परिसरापासून लांब असलेल्या हॉटेल-कॅफेंना जोडप्यांची पसंती.
❤️ दर्शनी भाग काळ्या काचेने किंवा इतर स्टिकर लावून झाकून टाकला जातो. त्यामुळे हॉटेल- कॅफेमधील हालचाली दिसत नाही. तर काही ठिकाणी वरील मजल्यावरही बसण्याची सुविधा असल्याने तेथे सुरक्षितता मिळत असल्याने तरुणाईची गर्दी असते.
❤️ वाढदिवस, व्हॅलेंटाइन डे, कॉलेज डे असल्यास हॉटेल-कॅफेमध्ये अंतर्गत सजावट असल्याने सेलिब—ेशनचा आनंद द्विगुणीत होत असल्याने गर्दी.

कपलसाठी आडोसे! :

काही हॉटेल-कॅफेंमध्ये जोडप्यांना काय खायचे किंवा प्यायचे याचीही विचारपूस करत नाही. प्रतितासाने 50 ते 300 रुपये दर आकारून जोडप्यांना बसू दिले जाते. त्यामुळे संबंधित चालकास फक्त जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मोबदला मिळत असल्याचे बोलले जात आहे. तर शहरालगत काही ठिकाणी हॉटेल-कॅफेचालकांनी मोकळ्या जागेत छोट्या झोपड्या तयार करून तसेच झाडाझुडुपांत आडोसे तयार करून जोडप्यांना बसण्याच्या व्यवस्था उपलब्ध करून दिल्या आहेत.

या आधी निर्भया पथकासह पोलिसांकडून तरुण-तरुणींची चौकशी होत होती. मात्र, आता पोलिसांचा संवाद कमी झालेला दिसतो. या आधी साध्या वेशातील पोलिस तरुण-तरुणींमध्ये वावरत होत्या. मैदाने, उद्याने, महाविद्यालयीन परिसर किंवा अंधारात गप्पा मारणार्‍या जोडप्यांची विचारपूस करून काही वेळेस जोडप्यांच्या पालकांनाही बोलवले जात होते. त्यामुळे टवाळखोरांसोबतच जोडप्यांमध्ये धाक निर्माण झाला होता. त्याचप्रमाणे हॉटेलची नियमित तपासणी होत होती. मात्र, आता याकडे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे अन्न व औषध प्रशासनाकडूनही हॉटेलमध्ये खाद्यपदार्थांची नियमित तपासणी होत नसल्याने एकांत शोधण्यासाठी आलेल्यांना नकळत आरोग्य समस्यांचाही सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा:

The post तरुणाई : तुझी माझी जोडी.. हॉटेल-कॅफेची लागलीय गोडी appeared first on पुढारी.