…तर काँग्रेसचीही स्वबळाची तयारी; संतप्त काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्षांना पत्र

नाशिक : राज्यात शिवसेनेसह काँग्रेस, राष्टवादी काँग्रेसच्या तीन पक्षांचे आघाडी सरकार सत्तारूढ आहे. एकीकडे हे तिन्ही पक्ष आगामी महापालिका निवडणूक आघाडीतर्फे लढण्याच्या घोषणा करतात, तर दुसरीकडे स्वबळाचा नारा दिला जातो. यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस सेवादलाने नाशिकामध्ये महाआघाडीने आम्हाला गृहित धरू नये, अशा आशयाचे पत्र काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठविले आहे. 

आम्हाला बळ द्या

पुढील वर्षीच्या प्रारंभीच नाशिक महापालिकेची निवडणूक होत आहे. शहरातील गल्लीबोळासह ग्रामीण भागात काँग्रेस पसरलेला असून, या पक्षाला मोठा जनाधार असल्याचे सेवादलाचे शहराध्यक्ष वसंत ठाकूर यांनी म्हटले आहे. वरीष्ठ पातळीवरील नेते महाविकास आघाडीतर्फेच महापालिका निवडणुका लढविल्या जातील असे सांगतात. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे काही नेते महापौर आमचाच असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण पसरल्याकडे श्री. ठाकूर यांनी प्रदेशाध्यक्षांचे लक्ष वेधले आहे. काँग्रेस गल्लीबोळात पसरलेला पक्ष असून, प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्हाला बळ द्या, अशी अपेक्षा ठाकूर यांनी प्रदेशाध्यक्ष पटोले यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. 

हेही वाचा - दोन वर्षांपासून बेपत्ता प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी शेवट! 'व्हॅलेंटाईन डे'पुर्वी झोपडीत आढळले मृतदेह