…तर बिर्हाड मोर्चेकरी आत्मदहन करतील; कर्मचारी कृती समितीचा इशारा

इंदिरानगर (नाशिक) : आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्यासोबत बुधवारी (ता. १६) होणाऱ्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर, बिर्हाड मोर्चेकरी आत्मदहन करतील, असा इशारा कर्मचाऱ्यांच्या कृती समितीतर्फे देण्यात आला. 

आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहात अनेक वर्षांपासून तासिका आणि मानधन तत्वावर वर्ग-३, वर्ग-४ कर्मचारी, रिक्त पदावर अत्यल्प मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित शासनसेवेत सामावून घेण्याची मागणी करत मुंबईकडे निघालेल्या बिर्हाड मोर्चामधील सुमारे एक हजार कर्मचारी पाथर्डी फाटा येथील आर. के. लॉन्स येथे चार दिवसांपासून पोलिसांनी थांबवले आहेत. प्रांत कार्यालयातर्फे त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा
 

आत्मदहनाशिवाय पर्याय राहणार

गेल्या ५ महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आले आहे. मागील वर्षाचे मानधनही अद्याप देण्यात आलेले नाही. तातडीने मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आत्मदहनाशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, असा इशारा या सर्व कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी निवेदनाद्वारे दिला. 
निवेदनावर महेश पाटील, सचिन वाघ, अण्णासाहेब हुलावळे, सी. के. गावीत, रूपाली कहांडोळे, रेणुका सोनवणे, संतोष कापुरे, रमेश गावीत, जब्बार तडवी, जितेंद्र गुरव, दिनेश देशमुख, फारूक कुरेशी आदी कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत. खासदार भारती पवार आणि माजी आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनीही आंदोलकांची भेट घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. 

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ

गेल्या काही महिन्यांपासून उपासमारीची वेळ आली आहे. सर्व स्तरांवरून आश्वासने मिळाली आहेत. मात्र कार्यवाही होत नसल्याने आयुष्याची चिंता वाढली आहे. शासनाने सहानुभूतीपूर्वक आमचा विचार करून आता न्याय दिला पाहिजे. 
- बाइसीबाई वळवी, कर्मचारी 

आमची फक्त आश्वासनांवर बोळवण होत आहे. एक प्रकारे थट्टा सुरू आहे. आता आरपारच्या लढाईसाठी सर्व कर्मचारी सज्ज असून तोडगा निघेपर्यंत मागण्यांवर ठाम आहोत. 
- महेश पाटील, कृती समिती पदाधिकारी