…तर लॉकडाउनची पूर्वीप्रमाणेच कडक अंमलबजावणी – छगन भुजबळ

नाशिक : कोरोनाची पहिलीच लाट संपण्याऐवजी त्यात, चिंताजनक वाढत आहे. कोरोना बरा झाल्यानंतर पून्हा कोरोना बाधित होण्याची शक्यता लक्षात घेता बिटको हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालयासह प्रत्येक तालुकास्तरावर तात्काळ पोस्ट कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय आजच्या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.

तसेच कोरोनाची तीव्रता लक्षात येउनही कोरोनाला गांभिर्याने घेतला जात नसेल तर, पूर्वीप्रमाणे कडक निर्बंधाची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले. 

पहिली लाट कायम 

भुजबळ म्हणाले, कोरोनाबाधितांची संख्या सप्टेंबर महिन्यापर्यंत कमी झाली होती. दसरा, दिवाळीनंतर रोज ८० ते १०० सरासरीने रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे पहिली लाट संपलेली नाही.कोरोनामुक्त झालेल्यात रुग्णांमध्ये पुन्हा कोरोनीची लक्षणे दिसू लागल्याने त्यांच्यावर देखील उपचाराची गरज असल्याने जिल्ह्यांत पोस्ट कोबिड मार्गदर्शन केंद्रे सुरू करुन पोस्ट कोविड सेंटरमधून बरे झाल्यानंतर देखील रुग्णांनी काय काळजी घेण्यात यावी, याविषयी माहिती देण्याचे निर्देश श्री भुजबळ यांनी दिले. 

हेही वाचा >> एकुलत्या एक लेकाची जेव्हा निघाली अंत्ययात्रा; मटाणे गावावर शोककळा

हर्ड इम्युनिटी तपासणार 

मालेगाव प्रमाणेच नाशिक शहरातील काही भागात नागरीकांची हर्ड इम्युनिटी तपासण्यासाठी महापालिकेतर्फे ‘सिरो टेस्ट़' करण्यात यावी असे बैठकीत ठरले. लस येईपर्यंत सर्वांनी सर्वानी मास्कचा वापर करावा. दुकानदारांनी नो मास्क, नो एंट्री नियमाचे काटेकोरपणे पालन करावे. विना मास्क ग्राहकांसोबत व्यवहार करू नये अन्यथा संबंधित दुकान दोन दिवस सक्तीने बंद ठेवण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दिपक पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे, महापालिकेचे नोडल अधिकारी डॉ. आवेश पलोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अन्न औषध प्रशासनाच्या सहआयुक्त माधुरी पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सतिश भामरे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा>> उच्चशिक्षित दिव्यांग रामेश्वरचा संघर्ष! रेल्वे बंदमुळे फरफट; प्रशासकीय सेवेत अधिकारी बनायचे स्वप्न 

पालकमंत्री म्हणाले 
- कोविड चाचण्यांची संख्या वाढवावी 
- कोरोनाचे तपासणी अहवाल त्याचदिवशी मिळावे 
- बिटकोत ऑटोमॅटिक एक्स्ट्रशन मशिन बसविणार 
- जिल्ह्यातच तपासणी अहवाल मिळविण्याचे प्रयत्न