…तर स्थायी समितीची सत्ता भाजप गमावणार; मनसेसह १ सदस्य पक्षांचे वाढले महत्त्व 

नाशिक : विषय समिती सभापती, उपसभापती निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तौलनिक संख्याबळ विचारात घेत निवडणूक घेतल्याने स्थायी समिती सभापती निवडणुकीतही तौलनिक संख्याबळ लक्षात घेऊनच निवड करावी लागणार आहे. त्यामुळे स्थायी समितीची सत्ता भारतीय जनता पक्षाच्या हातून जाण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह एक सदस्य असलेल्या पक्षांना महत्त्व आले आहे. शिवसेनेकडूनही सत्ता काबीज करण्याची तयारी सुरू आहे. स्थायीची सत्ता हातून गेल्यास भाजपसाठी हा मोठा धक्का असेल. 

महापालिकेत भाजप हा सर्वांत मोठा पक्ष असल्याने स्थायी समितीसह विविध विषय समित्यांवर वर्चस्व आहे. पंचवटी विभागातील एका सदस्याचे निधन झाल्याने अद्याप ते पोटनिवडणूक जाहीर झालेली नाही. त्यामुळे स्थायी समितीत भाजपचे तौलनिक संख्याबळ घटले आहे. तौलनिक संख्याबळाचा विचार करता पूर्वी भाजपच्या नऊ सदस्यांची नियुक्ती होती. आता आठ सदस्यांची नियुक्ती होणार आहे. शिवसेनेचे पाच, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेचे प्रत्येकी एक असे एकूण १६ सदस्य राहतील. सत्ताधारी भाजप व विरोधकांचे समसमान पक्षीय बलाबल असल्याने बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला मनसे किंवा अन्य पक्षांची मदत घ्यावी लागेल. सद्यःस्थितीत मनसे भाजपला जवळचा वाटत असल्याने त्या पक्षाची मदत घेतली जाईल. परंतु त्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. 

सत्तास्थापनेची शिवसेनेची तयारी 

पंचवार्षिकमधील शेवटचे वर्ष असल्याने व त्यातही तौलनिक संख्याबळानुसार शिवसेनेचे चारऐवजी पाच सदस्यांची नियुक्ती होणार असल्याने सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला आयती संधी चालून आली आहे. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची मोट बांधून मनसेला बरोबर घेतल्यास भाजपला सत्तेपासून सहज दूर ठेवण्याची तयारी सुरू झाली आहे. 

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..

...तर महापौरपद धोक्यात 

गेल्या वर्षी महासभेत स्थायी समिती सदस्यांची घोषणा करताना शिवसेनेने अतिरिक्त एक सदस्य नियुक्तीची मागणी केली होती. परंतु त्यानंतरही महापौर सतीश कुलकर्णी यांनी आठ सदस्य नियुक्त केल्याने भाजपला स्थायी समितीत सत्ता स्थापन करता आली. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. १३ जानेवारी २०२१ ला त्यावर सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी महापौरांना नवीन सदस्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. विषय समित्यांच्या निवडणुका तौलनिक संख्याबळानुसारच झाल्या आहेत. त्यामुळे महापौरांनाही नवीन सदस्यांची नियुक्ती करताना नवीन तौलनिक संख्याबळानुसारच घोषणा करावी लागेल. गेल्या वर्षाप्रमाणे सदस्यांची नावे घोषित केल्यास महापौरपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

असे आहे तौलनिक संख्याबळ 

भाजपचे ६४ सदस्य असल्याने तौलनिक संख्याबळ ८.४६ आहे. शिवसेनेचे ३५ सदस्य असल्याने ४.६२ संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपचे आठ, तर शिवसेनेचे पाच सदस्य समितीवर नियुक्त होतील.