तळीराम कोविड लस घेण्यापासून दोन हात दूर? सध्या विषय मोठ्या प्रमाणात चर्चेचा

सिडको (नाशिक) : ‘डॉक्टरसाहेब, लस घेतल्यानंतर मद्यप्राशन करता येईल का हो, अशा प्रकारची विचारणा सध्या तळीरामांकडून मोठ्या प्रमाणात डॉक्टरांबरोबरच आपल्या जवळच्या मित्रपरिवाराकडे होतानाचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे सध्या हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेचा ठरत आहे. 

‘डॉक्टरसाहेब, लस घेतल्यानंतर मद्यप्राशन करता येईल का हो?
मद्यप्राशन करता येत नाही, या धाकाने बहुतांश तळीराम कोविडची लस घेण्यापासून दोन हात दूर राहात असल्याची धक्कादायक बाब आता समोर येऊ लागली आहे. वय वर्ष ४५ च्या पुढील नागरिकांना सध्या सर्वत्र कोविड लस शासनाने उपलब्ध करून दिली आहे, असे असतानाही केवळ वयोवृद्ध व्यक्ती व मद्यप्राशन न करणाऱ्यांचे प्रमाण यात अधिक दिसून येत आहे. तर वय वर्षे ४५ च्या पुढील पुरुष मंडळी (मद्यप्राशन करणारे) मात्र यात मागे असल्याचे आकडेवारीवरून दिसते. याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यातील काही तळीरामांना लस घेतल्यानंतर मद्यप्राशन करता येणार नाही, असा काहीसा गैरसमज त्यांच्यात पसरवण्यात आला.

हेही वाचा - अवघे गाव हळहळले; दोन दिवसांपूर्वीच्या लेकीच्या लग्नाच्या मांडवातूनच निघाली पित्याची अंत्ययात्रा  

तज्ज्ञ डॉक्टरांकडून माहिती देण्यास टाळाटाळ

याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून माहिती घेतली असता लसीकरणानंतर मद्यप्राशन करू नये किंवा करावे याबाबत कुठल्या प्रकारची गाइडलाइन आरोग्य विभाग अथवा शासनाकडून आलेली नाही. त्यामुळे यावर भाष्य करणे त्यांनी टाळले. मात्र असे असले तरी मद्यप्राशन करणे शरीरास हानिकारक आहे. त्याचे कोणीही समर्थन करू शकत नाही. त्यामुळे ‘समझनेवाले को इशारा काफी है।’ यासंदर्भात मोरवाडी येथील महापालिकेच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. छाया साळुंखे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले.  

 

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ