ताज हॉटेलजवळील गोळीबार प्रकरण : संशयितांना अहमदाबादमधून शस्त्रास्त्र, कारसह अटक

मालेगाव (नाशिक) : शहरातील जुन्या महामार्गावरील ताज हॉटेलजवळ गेल्या आठवड्यात पुर्ववैमन्स्यातून दोघांवर झालेल्या गोळीबार व चाकू हल्ला प्रकरणातील उर्वरित पाच संशयितांच्या शहर पोलिसांनी अहमदाबाद (गुजरात) येथे शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या. अटक केलेले सर्व सराईत गुन्हेगार आहेत. गुन्ह्यांची माहिती काढून मोक्का व एनपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल असे अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांनी बुधवारी (ता. 20) पत्रकार परिषदेत सांगितले.

14 जानेवारीला घडला प्रकार

जुन्या महामार्गावर 14 जानेवारीला इब्राहीम खान इस्माईल खान (28, रा. नागछाप झोपडपट्टी), अबरार शेख (24, रा. आयेशानगर) या दोघांवर शहीद गांजावाला टोळीतील 10 ते 12 सराईत गुन्हेगारांनी गोळीबार, चाकू हल्ला केला. इब्राहीम खान हा गोळी लागल्याने जबर जखमी झाला होता. घटना घडल्यानंतर अवघ्या 24 तासांत पोलिस अधिक्षक सचिन पाटील, खांडवी, उपअधिक्षक लता दोंदे, पोलिस निरीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मनोहर पगार, उपनिरीक्षक राजेंद्र पाटील, पोलिस नाईक सचिन निकम, विशाल गोसावी आदींच्या पथकाने इम्रान गफ्फार शाह (25, रा. हिंगलाज नगर), इश्‍तियाक मोहंमद मुस्तफा (28, रा. पिवळा पंप), दानीश सैय्यद इस्माईल (21, रा. नया आझादनगर), अबुल हासीम इकबाल मोहंमद (25, रा. किल्ला) व सलमान मोहंमद सलीम (28, रा. इस्लामपुरा) या पाच जणांना अटक केली होती. 

पाच जणांना अटक

हे सर्व संशयित मंगळवार (ता. 19) पर्यंत पोलिस कोठडीत होते. संशयितांनी दिलेली माहिती व अन्य संशयितांनी मोबाईल क्रमांक मिळवत तांत्रिक विश्‍लेषण विभागाकडून माहिती घेऊन संशयितांचा सुरत, गुजरात येथे शोध घेतला. यानंतर अहमदाबाद येथून याच पथकाने सईद शेख रफीक उर्फ गांजावाला (29, रा. कमालपुरा), मसूदखान कमालखान उर्फ मसूद गांजावाला (24, रा. मुस्लीमपुरा), फिरोज कलीम अहमद उर्फ फिरोज गांजावाला (25, हिरापुरा), जाहीद शेख आबीद उर्फ जाहीद गांजावाला (30, नया इस्लामपुरा) व मोईन शेख जब्बार उर्फ मोईन काल्या (37, मच्छीबाजार) या पाच जणांना अटक केली. 

हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क

सहा लाख 40 हजार 300 रुपयांचा ऐवज जप्त

संशयितांकडून मोटारसायकल, इर्टीगा कार, गावठी पिस्तुल, दोन तलवार, चाकू, पाच मोबाईल असा सहा लाख 40 हजार 300 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. संशयितांना 22 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. 

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना