नाशिक : पुढारी वृत्तसेवा – श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वरला भाविकांना त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी तिरूपती बालाजी, केदारनाथ व अमरनाथच्या धर्तीवर नियोजनसंदर्भात चाचपणी करावी. त्यासाठी सदर देवस्थानांच्या पध्दतीचा अभ्यास करावा, असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी देवस्थान समितीला दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी मंदिर परिसरात भाविकांना झालेल्या मारहाणीची त्यांनी यावेळी माहिती घेतली.
संत निवृत्तीनाथ पालखी सोहळा व आगामी श्रावण महिन्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी शर्मा यांनी सोमवारी (दि.१७) त्र्यंबकेश्वर येथे भेट देत पाहाणी केली. यावेळी देवस्थान विश्वस्तांशी त्यांनी चर्चा केली. श्रावण महिन्यात देशभरातून भाविक त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी गर्दी करतात. गेल्या वर्षी पहिल्या श्रावणी सोमवारी साधारणत: लाखभर भाविक उपस्थित होते. त्यामूळे दर्शन घेताना भाविकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागताे. यासर्व पार्श्वभुमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. दररोज किमान १३ हजार भाविक मंदिरात दर्शन घेऊ शकतात. गर्दीच्या काळात त्यात वाढ होत पंधरा हजारांपर्यंत ही संख्या पाेहचते. श्रावणात १८-१८ तास मंदिर खुले ठेऊनही भाविकांना दर्शन घेण्यासाठी हालअपेष्ठा सहन कराव्या लागतात.
पासेसची चाचपणी सुरु
त्र्यंबकेश्वरला भाविकांची होणारी गर्दी व दर्शनाची मर्यादा लक्षात घेता तिरुपती बालाजी, केदारनाथ, श्री क्षेत्र शिर्डीच्या धर्तीवर दर्शनासाठीची सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहेे. बालाजी देवस्थान व अन्य ठिकाणी भाविकांना नोंदणी करुन दर्शनाचे पासेस दिले जातात. त्यानूसार दिलेल्या वेळेत भाविक दर्शन घेतात. त्यामध्ये व्हीआयपी दर्शनासाठी सशुक्ल पासेस वितरीत केले जातात. त्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथेही दर्शन सुविधेसाठी पासेसची चाचपणी सुरु आहे. जिल्हाधिकारी शर्मा यांनी संबंधित देवस्थानचा अभ्यास करुन त्याचा सविस्तर अहवाल सादर करावा, असे विश्वस्तांना सांगितले आहे.
त्र्यंबकेश्वरला दर्शन रांगेचे नियोजन कोलमडत असल्याने भाविकांना ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे गर्दीचे नियोजन आवश्यक आहे. तिरुपती बालाजी व केदारनाथ तसेच देशातील अन्य मोठ्या देवस्थानांमधी दर्शन व्यवस्थेच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठीच्या नियोजन करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. -जलज शर्मा, जिल्हाधिकारी.
हेही वाचा: