तीन दिवसांपेक्षा जास्त बाजार समित्या बंद नको; पणन संचालकांचे प्रशासनाला आदेश 

नामपूर (जि.नाशिक) : मार्चएंड, मजूरटंचाई, आर्थिक टंचाई, वार्षिक हिशेब तपासणी, दिवाळी आदी कारणांमुळे राज्यातील अनेक बाजार समित्यांमधील शेतमालाचे लिलाव अनधिकृतपणे दहा दिवसांपेक्षा अधिक काळ बंद राहत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. याबाबत ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’ने अनेकदा बाजार समित्यांमधील कुप्रथा उजेडात आणल्याने राज्यातील बाजार समित्या तीन दिवसांपेक्षा अधिक काळ बंद ठेवू नयेत, असे आदेश पणन संचालक सतीश सोनी यांनी मंगळवारी (ता. ६) यंत्रणेला दिले.

पणन संचालकांचे प्रशासनाला आदेश 

जिल्हा उपनिबंधकांनी १० एप्रिलपर्यंत बाजार समित्यांच्या नियोजनाचा अहवाल सादर करावा, असेही आदेशात नमूद केले आहे. राज्यात अनेक बाजार समित्या धार्मिक सण, उत्सव आणि त्याला जोडून आलेली साप्ताहिक सुटी यामुळे सलग तीन दिवस शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवतात. काही बाजार समित्यांमध्ये यात्रा, अमावस्या, व्यापाऱ्यांचा दौरा, विवाह समारंभ अशा कारणांसाठीही बाजार समितीमधील शेतमाल खरेदी-विक्रीचे सौदे बंद ठेवतात. बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी-विक्रीचे सौदे बंद राहिल्याने, शेतमाल विक्रीस उशीर झाला तर त्याचा शेतमालाच्या प्रतीवर परिणाम होतो आणि शेतमालाचे दरही कमी होतात. याचा शेतमाल पुरवठा साखळीवरही विपरीत परिणाम होऊन, ग्राहकांना मात्र वाढीव दराने धान्य, फळे, भाजीपाला खरेदी लागतो. सुटीचा कालावधी संपल्यानंतर, बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमाल एकदम विक्रीस येतो आणि आवक वाढल्यामुळे पुन्हा या शेतमालाचे दर पडतात. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांचेच नुकसान होते. पणन संचालकांनी शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी हा निर्णय घेतला.

हेही वाचा - Success Story : दृष्टिबाधित ज्ञानेश्‍वरची भरारी! मेहनत, चिकाटी व स्वकष्टातून बनला बँक अधिकारी 

तीन दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी बंद राहणार नाहीत

महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चे कलम २९ मध्ये बाजार समितीची शक्ती व कर्तव्ये नमूद केली आहेत. कलम २९(२) (सहा)मध्ये अधिसूचीत कृषी उत्पन्नाच्या लिलावाचे विनियमन करणे व त्यावर देखरेख करण्याचे कर्तव्य बाजार समितीचे आहे. त्यानुसार बाजार समितीमध्ये शेतमाल खरेदी-विक्रीचे सौदे सलग तीन किंवा तीन दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी बंद राहणार नाहीत, याची दक्षता बाजार समित्यांनी घेणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व बाजार समित्या, सहाय्यक निबंधक, जिल्हा निबंधक यांना आदेशाच्या प्रती देण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

अशी आहेत बाजार समित्यांना सूचना 
-वर्षभरातील सुट्यांचे दिवस निश्चित करावेत. 
-आगामी वर्षाचे कॅलेंडर तयार करून त्यास ३१ मार्चपूर्वी मान्यता घ्यावी. 
-शेतमालाच्या लिलावाची प्रक्रिया नियोजनाचे पालन काटेकोरपणे करावे. 
-व्यापाऱ्यांच्या वैयक्तिक कारणांसाठी शेतमाल खरेदीचे व्यवहार बंद ठेवण्यास निर्बंध. 
-व्यापाऱ्यांनी वार्षिक नियोजनाव्यतिरिक्त बाजार बंद ठेवल्यास कारवाई करावी. 
-बाजार सुरू ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्था बाजार समितीने उपलब्ध करावी. 
-वर्षभराचे नियोजन समितीच्या नोटीस बोर्डवर आणि दर्शनी भागात प्रसिद्ध करावे. 
-वर्षभराच्या नियोजनाबाबत ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचित करावे. 

बाजार समित्या जास्त काळ बंद राहिल्यास सर्वांत जास्त फायदा व्यापाऱ्यांनाच होतो. बंद काळात शिवार खरेदी मात्र जोमाने सुरू असते. आवक दाटल्याने मातीमोल शेतमाल विकावा लागतो. पणन संचालकांच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी शेतकरी संघटना, उत्पादक यांनी बाजार समित्यांमधील कुप्रथांबाबत जाब विचारला पाहिजे. 
-दीपक चव्हाण, शेतमाल बाजारभाव अभ्यासक, पुणे