तीन दिवसात सहा जणांचे मृत्यू; येवलेकरांची वाढली चिंता

येवला (जि.नाशिक) : वाढत्या रुग्ण संख्येबरोबरच कोरोनामुळे मृत्यु पडणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.मागील तीन दिवसात सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यामुळे मृतांचा आकडा ६५ वर पोहोचला आहे.

तीन दिवसात सहा जणांच्या मृत्युने येवलेकर भयभीत
पहिल्या टप्प्यात नाशिक मालेगावनंतर येवल्याचा क्रमांक लागला होता.यावेळी मात्र रुग्ण संख्येचा वेग इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी असला तरी वाढणारी रुग्ण संख्या आणि मृतांची संख्यामुळे नागरिकात दहशत पसरली आहे.येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड केयर सेंटर सुरू झाले असून येथे मृत्यूच्या घटना घडत आहे.विशेष म्हणजे नगरसूल येथे देखील केअर सेंटर असताना तेथे रंगकाम,दुरुस्तीची कामे काढून संबंधित अधिकारी नेमके काय साध्य करू पाहतात हाही सवाल व्यक्त होत आहे.

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

नगरसूलमध्ये दोघांचा कोरोनाने मृत्यू, ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ३५०
आरोग्य विभागात एकमेकांकडे बोट दाखविण्याच्या प्रकारात वाढ झाली असून यात लक्ष घालण्याची गरज आहे.येथील काही खासगी रुग्णालयातही मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचार घेत असल्याने संख्येचा अंदाज येणे कठीण झाले आहे. विशेषत: खाजगी उपचार घेणारे कोरोना टेस्टऐवजी सीटी स्कँन करत असून ही संख्या मोठी असून त्याची नोंद होत नसल्याने नेमका आकडा पुढे येत नसला तरी ही संख्या रोजच तीन अंकात जात असल्याचा अंदाज आहे.

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

कोरोना बाधित एकूण मृतांची संख्या ६५
दरम्यान,तालुक्यातील नगरसूल येथील दोघा करोनाबाधित रुग्णांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर नाशिक आणि कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, या दोघांच्या मृत्यूमुळे गेल्या तीन दिवसात ६ जणांचा तर तालुक्यातील एकूण ५ जणांचा मृत्यू झाल्याचे चित्र समोर आले आहे.आतापर्यंत तालुक्यातील कोरोना बाधित एकूण मृतांची संख्या ६५ झाली आहे. मंगळवारी तालुक्यातील ४१ जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले असून तालुक्यातील ॲक्टिव्ह करोना बाधितांची एकूण संख्या ३५० झाल्याची माहिती आरोग्य विस्तार अधिकारी राजेंद्र खैरे यांनी दिली.