तीन लाखांपर्यंत शेतकऱ्यांना शून्य टक्क्याने कर्जपुरवठा; कृषिमंत्री दादा भुसे यांची माहिती 

मालेगाव (जि. नाशिक) : व्याजाच्या जाचातून शेतकऱ्यांची मुक्तता व्हावी व शेतकरी थकबाकीदार होऊ नये, यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. तीन लाखांपर्यंत पीककर्ज घेणाऱ्या व ते वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २०२१ च्या खरीप हंगामापासून शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. 

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत सहकारी कृषी पतसंस्थेकडून तसेच राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण व खासगी बँकांकडून पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाखापर्यंतच्या कर्जावर वार्षिक तीन टक्के व तीन लाखांपर्यंतच्या पीककर्जावर वार्षिक एक टक्के दराने व्याज सवलत योजना सुरू आहे. शेती व्यवसायावर येणाऱ्या विविध नैसर्गिक संकटांमुळे अनेकदा पीककर्जावरील व्याज भरणे शेतकऱ्यांना अडचणीचे होते. व्याजाच्या जाचातून शेतकऱ्यांची मुक्तता व्हावी, यासाठी भुसे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO 

२०२१-२२ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सहकारमंत्र्यांकडे, तसेच मंत्रिमंडळ बैठकीत  भुसे यांनी तीन लाख रुपये मर्यादेपर्यंत पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा करावा, अशी विनंती केली होती. यावर शासनाने सकारात्मक निर्णय घेतला. खरीप हंगाम २०२१ पासून तीन लाखांपर्यंतच्या पीककर्ज घेणाऱ्या व वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा करण्याचे जाहीर केले. पीककर्जावरील व्याजाची रक्कम शेतकऱ्यांतर्फे शासनामार्फत चुकती करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक तेवढा निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. या निर्णयाबद्दल श्री. भुसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आभार मानले.  

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड