तीस दिवसांत स्थलांतरित व्हा! महापालिकेची नोटीस; श्रमिकनगरवासीय आंदोलनाच्या पवित्र्यात 

जुने नाशिक : श्रमिकनगर झोपडपट्टीवासीयांनी तीस दिवसांत स्थलांतरित व्हा, अन्यथा झोपड्या निष्कासित करणार असल्याची जाहीर नोटीस असलेले फलक महापालिकेतर्फे लावले आहेत. यामुळे रहिवाशांमध्ये संतापाची लाट पसरली असून, जीव गेला तरी चालेल जागेवरून हलणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. याबाबत त्यांनी बैठक घेऊन निषेध केला. 

नोटिशीने रहिवाशांमध्ये भीती

साठफुटी रोड (गंजमाळ) येथील श्रमिकनगर झोपडपट्टीधारकांना घरकुल योजनेचा लाभ दिला आहे. लाभ घेऊनही काही लाभार्थी जुन्या ठिकाणी राहत असल्याचे निदर्शनात आले आहे. त्यानिमित्ताने महापालिकेने नोटीस लावली आहे. तसेच महापालिका कर्मचाऱ्यांकडून ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातूनही सूचना दिल्या आहेत. नोटिशीने रहिवाशांमध्ये भीती निर्माण तर झाली आहे, याशिवाय निषेधही व्यक्त केला आहे. त्यानिमित्ताने किशोर घाटे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. १२) दुपारी रोटरी हॉल येथे रहिवाशांची बैठक झाली. गेल्या चार पिढ्यांपासून आम्ही येथे राहत आहोत. उदरनिर्वाहाचे साधनही येथेच आहे. अन्य ठिकाणी स्थलांतरित केल्यास उपासमारीची वेळ येणार आहे. शिवाय आमच्या हक्काची घरे आहेत. आम्ही सोडून का जावे, महापालिकेकडून अन्याय केला जात आहे. महापालिकेने नोटीस मागे घ्यावी, अन्यथा न्याय्य हक्कासाठी आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा या वेळी दिला. महापालिकेकडून वडाळागावातील घरकुल लाभार्थ्यांबद्दल महापालिका बोलत आहे. मुळात ते लाभार्थी वेगळे आहेत. त्यांचा श्रमिकनगर रहिवाशांशी काही संबंध नसल्याचेही सांगितले. 

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट 

श्रमिकनगरवासीयांवर नोटीस बजावण्याच्या माध्यमातून अन्याय केला जात आहे. त्यांना आहे त्या ठिकाणी इमारती बांधून देण्यात याव्यात. नोटीस मागे घ्यावी, अन्यथा न्याय्य हक्कासाठी मोर्चा, उपोषण करण्यात येईल. 
-किशोर घाटे, माजी नगरसेवक 

चार पिढ्यांपासून वास्तव्यास आहे. घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही, असे असताना महापालिकेने नोटीस फलक लावला आहे. जीव गेला तरी आम्ही येथून हलणार नाही. 
-सुरेश कबाडे, रहिवासी 

घरकुल योजनेतील घरे रद्द करण्याचे नोटीस फलकात नमूद केले आहे. आम्हाला लाभच मिळाला नाही तर मग सदनिका रद्द झाल्या, तरी आम्हास फरक पडत नाही. अतिक्रमण काढण्यासाठी आमच्या अंगावरून जेसीबी चालवावा लागेल. 
-परवीन शेख, रहिवासी  

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी