तेरे जैसा यार कहा…! कोरोनाबाधित मित्रासाठी धावला मित्र; मुंबईहून नंदुरबारला पाठवले ‘रेमडेसिव्‍हिर’ 

देवळा (जि.नाशिक) : १९९३-९४ या वर्षात देवळा येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या मित्रांनी गेल्या महिन्यातच व्हॉट्सॲप ग्रुप बनवत कोण, कुठे, कसे, काय अशी संदेशांची देवाणघेवाण सुरू केली. तब्बल २६ वर्षांनंतर हे सर्व मित्र एकमेकांशी जोडले गेले

कोरोना काळात मैत्रीचा किस्सा सध्या कौतुकाचा विषय

कोरोना काळात मैत्री निभावणेही अवघड झाले असताना येथील मित्रांनी आपल्या कोरोनाबाधित मित्रास मुंबईहून रेमडेसिव्‍हिर इंजेक्शन उपलब्ध करून दिले. एवढेच नव्हे, तर ते थेट नंदुरबार येथे तत्काळ पोच करत मित्रास व त्याच्या कुटुंबास कोरोनाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यास मदत केली. मैत्रीचा हा किस्सा सध्या कौतुकाचा विषय झाला आहे. 

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश

मित्राचे दुःख या ग्रुपवर शेअर
१९९३-९४ या वर्षात देवळा येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या मित्रांनी गेल्या महिन्यातच व्हॉट्सॲप ग्रुप बनवत कोण, कुठे, कसे, काय अशी संदेशांची देवाणघेवाण सुरू केली. तब्बल २६ वर्षांनंतर हे सर्व मित्र एकमेकांशी जोडले गेले. त्यात लोहोणेर (ता. देवळा) येथील प्रशांत पवार हे नंदुरबार जिल्ह्यात चिंचपाडा माध्यमिक शाळेत लिपिक म्हणून कार्यरत असून, त्यांच्यासह पूर्ण कुटुंबाला कोरोनाने विळखा घातला असल्याचे दुःख या ग्रुपवर शेअर झाले. मित्रांनी आर्थिक, तसेच इतर काही अडचण असल्याचे विचारले असता, उपचारासाठी रेमडेसिव्‍हिर इंजेक्शन येथे उपलब्ध होत नसल्याने जीवन धोक्यात असल्याचे व्यक्त केले.

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ

प्रशांत पवार यांना अश्रू अनावर

यावर सर्वच मित्रांनी प्रयत्न केले. मात्र यश मिळत नव्हते. यातील एक मित्र खुंटेवाडी येथील माजी सैनिक जिभाऊ खैरनार हे मुंबईत पोलिस म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी लगेचच प्रयत्न करत रेमडेसिव्‍हिर इंजेक्शन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यात यश आल्याने तत्काळ कागदपत्रे, वैद्यकीय मागणी व इतर तपशील मागवून घेत सदर रेमडेसिव्‍हिर इंजेक्शन घेत ते थेट नंदुरबार येथे पोच केले. इतका प्रवास करत मित्र आपल्यासाठी इंजेक्शन घेऊन आल्याचे पाहून प्रशांत पवार यांना अश्रू अनावर झाले. पवार कुटुंबीय आता कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी किशोर पाटील (पोलिस), विष्णू शेवाळे, विनय मेतकर, दादाजी देवरे यांची खास मदत झाली. 

 

जिभाऊ खैरनार व मित्रांनी माझ्यासाठी केलेली ही लाखमोलाची मदत मी कधीच विसरणार नाही. प्रत्येकाने मित्रांची संपत्ती जपावी.- प्रशांत पवार