ते दोघेही रात्रभर मृतदेहासोबत झोपून होते; सोमठाण जोशची धक्कादायक घटना

येवला (जि.नाशिक) : मृतदेह झाकून ठेवत दोघेही रात्रभर मृतदेहासोबत झोपून राहिले. सकाळी या घटनेची माहिती विहीरमालकाला मिळताच  घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिली. त्यावेळेस या घटनेचा उलघडा झाला.

ते दोघेही रात्रभर मृतदेहासोबत झोपून होते

रविवारी (ता. १४) रात्री अकराच्या सुमारास सोमठाण जोश येथे विहिरीचे काम करण्यासाठी आलेल्या मजुरांमध्ये दारू पिण्याच्या वेळी झालेल्या वादातून राजू राठोड (वय ३५, रा. जिंतूर, परभणी) याचे सहकारी संशयित दत्तू कोकाटे (रा. कोकणगाव, ता. निफाड) व संतोष ऊर्फ विनायक पवार (रा. हिसवळ, ता. नांदगाव) यांच्यात वाद झाले. या दोघांनी त्याच्या डोक्यावर लोखंडी पहार व लाकडी दांड्याने मारहाण केली. ९० मिली दारू का प्यायला, या कारणावरून तालुक्यातील सोमठाण जोश येथे एकाचा निर्घृण खून करण्यात आला. त्यात राजूचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह झाकून ठेवत आरोपी रात्रभर मृतदेहासोबत झोपून राहिले.

दारू पिण्याच्या वादातून मजुराचा निर्घृण खून 

सकाळी या घटनेची माहिती विहीरमालक तुकाराम खरात यांना मिळताच त्यांनी घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिली. तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली. उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या संशयितांना पोलिसी खाक्या दाखवताच खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.