नाशिक : पुढारी वृत्तसेवा; काही दिवसांत दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी एकाला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे भामट्यांनी तोतया पोलिस होऊन रोकड नेली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
संबधित बातम्या :
- कुरुंदवाड येथे धारदार शस्त्राने एकाचा खून
- Sasoon Case : पोलिसांप्रमाणे अधिकार्यांचे ‘अर्थ’पूर्ण संबंध
शिवाजी कारभारी शिंदे (५४, ता. निफाड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित सचिन नागनाथ तळेकर (४५, रा. सोलापूर) याच्यासह सहा जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे यांच्या फिर्यादीनुसार, संशयित तळेकरने दामदुपटीचे आमिष दाखवून पैसे गुंतवण्यास प्रोत्साहित केले. मात्र पैसे नसल्याने शिंदे यांनी त्यांच्या मित्रपरिवारात ही योजना सांगितली. त्यानुसार पुणे येथील ओमकार काळे व नांदगाव तालुक्यातील प्रदीप थोरात हे पैसे गुंतवण्यास तयार झाले. शुक्रवारी (दि. १३) शिंदे यांचे मित्र पैसे घेऊन नाशिकला आले, तर संशयित तळेकर हा शिंदे यांच्यासमवेत मुंबई नाका परिसरात आला. तेथे तळेकरने पैसे दुप्पट करण्याची योजना सांगितली तसेच पैसे ताब्यात घेतले.
पैशांची पिशवी घेऊन तळेकर व शिंदे निघाले. सायंकाळी ६.३० च्या सुमारास परिसरातील नारायणी रुग्णालयाजवळ आले. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या संशयिताला पैशांची बॅग दिली. त्यानंतर पुन्हा दुचाकीवरून तीन संशयित आले व त्यांनी ते स्वत: पोलिस असल्याची बतावणी केली. ‘तुम्ही बनावट नोटा देतात का?’ असे म्हणून संशयितांनी शिंदे व तळेकर यांना पोलिस ठाण्यात सोबत चला, असे सांगितले. त्यानुसार दोघेही संशयितांच्या वाहनावर बसले. विनयनगर पोलिस चौकीजवळ नेत संशयितांनी शिंदे यांना येथे उतरा व जा नाहीतर जेलमध्ये जाल, असे सांगून उतरवून दिले. घाबरलेले शिंदे त्यांचे मित्र थोरात व काळे यांना भेटले व घटनाक्रम सांगितला. मित्रांच्या मदतीने त्यांनी तळेकर व इतरांचा शोध सुरू केला, मात्र ते सापडले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिंदे यांनी तळेकरसह सहा जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
हेही वाचा :
- Lalit Patil Drug Case : ललित पळाला की पळवला याचे गुढ कायम
- Nashik Fraud News : हिरा उद्योग समूहाच्या व्यवस्थापकाकडून १० कोटींचा अपहार
- ‘पुढारी दसरा-दिवाळी शॉपिंग फेस्टिव्हल’ : रविवार ठरला ‘शॉपिंग संडे’
The post तोतया पोलिसांकडून एकाला दहा लाखांचा गंडा appeared first on पुढारी.