नाशिक : पुढारी वृत्तसेवा- संसदेवरील दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनीच नव्या संसद भवनाचे सुरक्षा कवच भेदून लोकसभेच्या सभागृहात दोन युवकांनी उड्या टाकत रासायनिक धूर सोडल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला असून, सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर करण्याचे निर्देश उपायुक्त नितीन नेर यांनी दिले आहेत. मुख्यालयात येणाऱ्या आगंतुकांची काटेकार तपासणी केली जाणार असून, ओखळपत्र तपासणीनंतरच मुख्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. (Nashik Municipal Corporation)
संसदेवर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सहायक आयुक्त नितीन नेर यांनी महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा गुरुवारी (दि. १४) घेतला. महापालिकेत २०१७ पर्यंत पालिकेचे सुरक्षा कर्मचारी कार्यरत होते. परंतु मंत्री बच्चू कडू व तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अपंगांच्या प्रश्नावर बैठक सुरू असताना थेट आयुक्तांवर हात उगारण्याचे प्रकार झाल्यानंतर महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या सुरक्षारक्षकांच्या हाती महापालिकेची सुरक्षा व्यवस्था सोपविली गेली. महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे ३३ सुरक्षारक्षक आहेत. यात महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनामध्ये १९ सुरक्षारक्षक तीन शिफ्टमध्ये कार्यरत आहेत. त्या व्यतिरिक्त पालिकेचे सुरक्षारक्षकही तैनात असतात. पालिकेत प्रवेश करण्यासाठी चार मुख्य प्रवेशद्वार आहेत. मुख्यत्वे स्थायी समितीसमोरील व मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराचा वापर अधिक होतो. चारही प्रवेशद्वारांवर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा उपायुक्त नेर यांनी घेतला. यावेळी मुख्यालयात येणाऱ्या आगंतुकांना ओळखपत्राशिवाय प्रवेश न देण्याचा तसेच सुरक्षारक्षकांनी जागरूक राहण्याच्या सूचना नेर यांनी सुरक्षा विभागाला दिल्या. (Nashik Municipal Corporation)
अशी आहे सुरक्षारक्षकांची संख्या
– राजीव गांधी भवन- १९
– महापालिका आयुक्त निवासस्थान- ६
– गंगापूर धरण- ४
– पंचवटी फिल्टर प्लान्ट- ४
हेही वाचा :
- Crime News : बनावट कागदपत्रांच्या आधारे 89 कोटींचा अपहार
- सातारा, सांगलीच्या पालकमंत्र्यांत संवाद नाही : जयंत पाटील
- Nashik Kumbh Mela 2026-27 : सिंहस्थासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती
The post 'त्या' घटनेनंतर महापालिकेची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक appeared first on पुढारी.