‘त्या’ दोन वर्षीय बालिकेच्या मृत्यूचे गुढ उकलण्यात नंदुरबार पोलीसांना यश

‘त्या’ दोन वर्षीय बालिकेच्या मृत्यूचे गुढ उकलण्यात नंदुरबार पोलीसांना यश

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : मृत अवस्थेत टाकून दिलेल्या दोन वर्षीय बालिकेच्या मृत्यूचे गुढ उकलण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला यश आले आहे. अत्याचार करून व नंतर गळा आवळून खून करणाऱ्या चारही संशयितांना अटक करण्यात आली आहे. या कामगिरी बद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्यासह सर्वांचे कौतुक केले जात आहे.

तथापि, गुजरात राज्यातील ही बालिका नेमकी कोण आहे व कुठून हरवली किंवा पळवली, याचा शोध घेण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे. तसेच, हा सामूहिक बलात्काराचा प्रकार आहे काय, याची खात्री पोलीस करीत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती अशी की, नंदुरबार शहरातील रेल्वे कॉलनी परिसरात असलेल्या रेल्वे नियंत्रण कक्षालगतच्या एका शौचालयाच्या टाकीत दिनांक ५ जुलै रोजी सकाळच्या सुमारास एका लहान दोन वर्षीय बालिकेचा मृतदेह तरंगताना आढळला. यानंतर शहरात खळबळ उडाली होती. या बालिकेचा मृत्यू कसा झाला? याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत होते. हा गुन्हा अतिशय गंभीर असल्याने गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान नंदुरबार जिल्हा पोलिसांपुढे होते.

आतापर्यंतच्या कामगिरीत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्याचप्रमाणे बालिकेचा मृतदेह आढळून आलेला गुन्हा देखील अवघ्या तीन दिवसात उघडकीस आणण्यात नंदुरबार जिल्हा पोलिसांना यश आले आहे. पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून मृत बालिकेची ओळख पटविण्यासह गुन्ह्यातील संशयीतांचा शोध घेण्याचे आदेश दिले.

त्यानुसार नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या अंमलदारांच्या वेगवेगळ्या सात पथकांनी तपास केला. घटना घडल्याच्या दोन दिवसांपूर्वी एका महिलेकडे ही मयत बालिका असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. सदर महिला शहरातील उड्डाणपुलाच्या खाली एका कॉलमच्या आडोशाला बसलेल्या अवस्थेत आढळल्यावर तिला ताबडतोब ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. संशयित महिलेसह तिचा पती रणजीत पवार, रवींद्र पावरा, मुकेश आर्य हे चौघे कचरा व भंगार वेचणारे आहेत. या चौघांनी दिनांक ३ जुलै रोजी गुजरात राज्यातील चलथान येथून बालिकेला उचलून घेत रेल्वेने नंदुरबार येथे आणले होते. हे संशयित बालिकेला सोबत ठेवून शहरातील रेल्वे स्थानक परिसरात तसेच कंजरवाडा भागात दारूचे सेवन करीत भटकत राहिले.

त्यादरम्यान दारूच्या नशेत बेभान झालेल्या रणजीत पवार या नराधमाने झोपलेल्या अवस्थेतील बालिकेवर निर्दयतेने अत्याचार केला. अत्याचाराच्या वेदना होत असताना ती चिमुकली जीवांच्या आकांताने रडत होती. काही लोकांनी तो रडण्याचा आवाज ऐकल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. नंतर चिमुकलीचा गळा आवळून तिचा निर्घुण खून केल्याचे समजते. त्यानंतर संशयित चौघांनी बालिकेचा मृतदेह रेल्वे नियंत्रण कक्षाच्या लगत असलेल्या एका शौचालयाच्या टाकीत फेकला व निघून गेले.

संशयित महिलेसह रणजीत दिना पवार (रा. नागसर, ता. नवापूर), मुकेश नारायण आर्य (रा. धानोरा, ता. सेंधवा, मध्यप्रदेश), रविंद्र विजय पावरा (रा. चिखली फाटा, शेलकुवी, ता. धडगाव) या संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, नंदुरबारचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, पोलीस उपनिरीक्षक हेमंत मोहिते तसेच स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

The post ‘त्या’ दोन वर्षीय बालिकेच्या मृत्यूचे गुढ उकलण्यात नंदुरबार पोलीसांना यश appeared first on पुढारी.