‘त्या’ रिक्षाचालकाचे मारेकरी मित्रच; चार संशयित गजाआड

रिक्षाचालकाचा खून नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – मेरी-रासबिहारी लिंकरोडवर औदुंबर लॉन्सजवळील मोकळ्या जागेत प्रशांत अशोक तोडकर (२८, रा. आदर्शनगर, रामवाडी) या रिक्षाचालकाचा खून झाला. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तपास करीत पिंपरी चिंचवड परिसरातून चार संशयितांना अटक केली. मित्रांनीच शाब्दिक वादातून प्रशांतचा खून केल्याचे समोर येत आहे.

विजय दत्तात्रय आहेर (३०, रा. रामवाडी), संकेत प्रदीप गोसावी (२६, रा. जुईनगर, म्हसरूळ), प्रशांत निंबा हादगे (२९, रा. पेठ रोड), कुणाल कैलास पन्हाळे (३०, रा. दिंडोरी रोड) अशी पकडलेल्या संशयितांची नावे असल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

असे घडले…

रविवारी (दि. १६) सकाळी 9 च्या सुमारास मोकळ्या जागेत प्रशांत तोडकरचा मृतदेह आढळला होता. डोक्यात दगड मारून खून झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी योगेश तोडकर (३४, रा. आदर्शनगर) यांच्या फिर्यादीनुसार म्हसरूळ पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिस तपासात प्रशांत हा शनिवारी (दि. १५) दिवसभर घरात होता. त्यानंतर रात्री रिक्षा घेऊन तो घराबाहेर पडला होता. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेहच मिळाला. त्यामुळे पोलिसांनी रात्री प्रशांत कोणा-कोणाला भेटला. घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यात पोलिसांनी मारेकऱ्यांची ओळख पटवली. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक रवींद्र बागूल, हवालदार प्रवीण वाघमारे, विशाल काठे, नाझीमखान पठाण, पोलिस नाईक विशाल देवरे, किरण शिरसाठ, प्रशांत मरकड, विशाल चारोस्कर यांच्या पथकाने तपास करीत संशयितांचा माग काढला. त्यात चौघेही पिंपरी चिंचवड येथे असल्याचे समजल्याने पथक त्यांच्या मागावर गेले. पुणे येथील निगडी परिसरातील थरमॅक्स चौकातून चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

वादातून झाला मित्राचा खून

संशयित आरोपी विजय आहेर व प्रशांत तोडकर यांच्यात काही दिवसांपूर्वी शाब्दिक वाद झाले हाेते. शनिवारी (दि. 15) दोघांमध्ये पुन्हा वाद झाल्याने विजय व इतर साथीदारांनी मिळून प्रशांतला मारहाण करीत त्याच्या डोक्यात दगड टाकून खून केला. त्यानंतर चौघेही फरार झाले होते.

हेही वाचा: