‘त्या’ सहाशे उमेदवारांना महापालिकेची नोटीस; हजर न झाल्यास गुन्हे दाखल होणार 

नाशिक : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने वैद्यकीय विभागामध्ये विविध तेराशे २१ पदांची भरती करूनही त्यातील सहाशे पदांवरील नियुक्त झालेले उमेदवार हजर होत नसल्याने अखेरीस महानगरपालिकेने अशा नियुक्त झालेल्या उमेदवारांना तातडीने हजर होण्याची सूचना देतांना, न झाल्यास गुन्हे दाखल करण्याचे नोटीसा काढल्या आहे. विशेष म्हणजे या पूर्वी नियुक्त झालेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मानधनात दुपटीने वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

वाढत्या कोरोनाला तोंड देण्यासाठी महानगरपालिकेने रुग्णालयांमध्ये पायाभूत सुविधा उभारताना मेडिकल स्टाफ देखिल मानधनावर नियुक्त करण्याचा निर्णय घेतला मार्च महिन्यात तब्बल तेराशे २१ पदांसाठी जाहिरात काढण्यात आली. यामध्ये सोळा विविध पदनामाची १३२१ पदांना जाहिरातीच्या माध्यमातून रुजू होण्यासाठी आदेश दिले. ११ एप्रिल पर्यंत ७२१ अधिकारी- कर्मचारी कोविड रुग्णांच्या सेवेत दाखल झाले. यात फिजिशियन, एमबीबीएस, बीएएमएस, स्टाफ नर्स, एएनएम, एम. डी. मायक्रोबायोलॉजी, एम.एससी मायक्रोबायोलॉजी, सिटी स्कॅन तंत्रज्ज्ञ, एमआरआय तंत्रज्ञ, लॅब टेक्नीशियन, समुपदेशक, वॉर्ड बॉय, फार्मासिस्ट, डाटा एंट्री ऑपरेटर, मल्टी स्किल हेल्थ वर्कर या महत्त्वाचा पदांचा समावेश आहे. परंतु सहाशे नियुक्त उमेदवार कोणतेही कारण न सांगता रुजू न झाल्याने त्यांना साथरोग प्रतिबंधात्मक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यानतंर्गत नोटीस देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी दिली. 

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

मानधनात घसघशीत वाढ 

मानधनावर नियुक्त वैद्यकीय कर्मछाऱ्यांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. फिजिशियन -दीड लाख वरून अडीच लाख रुपये प्रति महिना, मल्टी स्किल हेल्थ वर्कर -सात हजार रुपयांवरून १२ हजार रुपये, आया व वॉर्ड बॉय-सहा हजार रुपये वरून १२ हजार रुपये, एमबीबीएस ७५ हजार वरून रुपये एक लाख रुपये, बीएएमएस पदासाठी रुपये ४० हजार वरून रुपये ६० हजार रुपये, स्टाफ नर्स -या पदासाठी रुपये १७ हजार वरून रुपये २० हजार रुपये, एएनएम या पदासाठी रुपये १५ हजार रुपये वरून १७ हजार रुपये अशी वाढ आहे. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू 

जे अधिकारी कर्मचारी सबळ कारणाशिवाय रुजू होणार नाहीत त्यांचे विरुद्ध कार्यवाही केली जाणार असून नोटिसा पाठविण्यात आला आहेत. 
-डॉ. प्रवीण आष्टीकर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.