त्र्यंबकनगरीच्या वाटा यंदा ‘सुन्या-सुन्या’; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिंड्यांमध्ये घट 

खेडभैरव (जि. नाशिक) : कोरोना महामारीने मागील काही महिन्यात अनेक आनंद हिरावले आहेत. कितीतरी वर्षांनी चालत आलेल्या परंपरा या कालावधीत खंडित झाल्या. दरवर्षीप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथील संत श्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांची यात्रा यंदा रविवारी (ता.३) आहे. पण त्रिंबक नगरीच्या वाटा मात्र यंदा सुण्याच आहेत. 

यात्रेसाठी दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून अनेक पायी दिंड्यासह वारकरी ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरीचा जयघोष करत त्र्यंबककडे मार्गस्थ होतात. यात्रेच्या तीन-चार दिवसांपूर्वी इगतपुरीच्या ग्रामीण भागातील रस्त्यांवर नगर, पुणे आणि ठाणे जिल्ह्यातून येणाऱ्या दिंड्या त्र्यंबक नगरीकडे जात असताना टाळ, मृदुंगाचा गजराने व माऊलींच्या भजनाने येथील रस्ते दुमदुमून जातात. तसेच, दिंड्या मुक्कामी असणाऱ्या गावांमध्ये भजनाचा कार्यक्रम होतो. यात स्थानिक नागरिक ही सहभागी होतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर, आळंदीच्याही यात्रा रद्द झाल्या. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायर

मोजकेच वारकरी चालताय वाट

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव जरी कमी होत असला तरी खुल्या यात्रेला अजूनही परवानगी नाही. प्रशासनाकडून गर्दी टाळण्यासाठी वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गर्दी टाळण्यासाठी यंदा अनेक दिंड्याही रद्द करण्यात आल्या असल्याचे वारकरी सांगत आहेत. मात्र, वारीची परंपरा अखंडित राहावी म्हणून दिंडीतील काही मोजकेच वारकरी घोटीमार्गे त्र्यंबककडे मार्गस्थ होताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक दिंडी सोहळे ही रद्द असल्याचे चित्र आहे. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद: 

यात्रेच्या परिसरात गर्दी टाळण्यासाठी वारकरी दर्शन घेऊन मुक्काम न करता लगेचच परतताना दिसत आहेत. रस्त्याने जात असताना वारकऱ्यांसाठी स्थानिक होतकरू सांप्रदायिक नागरिक फराळ व जेवणाची सोय करताना दिसत आहेत. 

दरवर्षी गावाच्या जवळून जाणाऱ्या रस्त्यावर संत निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रेच्या दोन-तीन दिवसांपूर्वी दिंडी सोहळ्याची गर्दी असते. मात्र, यंदा दिंडी सोहळे खूप कमी आहेत. एका दिंडीत फार तर पाच सहा वारकरी जाताना दिसत आहेत. 
- नीलेश काळे, ग्रामस्थ, पिंपळगाव मोर.