
त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
येथील त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. त्यांनी देवाला वाहण्यासाठी आणलेली फुले जमा करण्यात येतात. यासह त्रिकाल पूजा, प्रदोषपुष्प पूजा करताना वाहिलेल्या फुलांचे आणि बेलाच्या पानांचे लक्षणीय प्रमाणात निर्माल्य तयार होते. या निर्माल्याचे करायचे काय? असा प्रश्न निर्माण होत असल्याने यापासून धूप, अगरबत्ती बनविण्याचा विधायक उपक्रम पुजारी तुंगार ट्रस्टने सुरू केला आहे.
श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्यातून तुंगार मंडळी ट्रस्टने श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या निर्माल्यापासून बनविलेल्या या अगरबत्तीचे लोकार्पण देवस्थान ट्रस्ट कार्यालयात सोमवारी (दि.17) सायंकाळी ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हा सत्र न्यायाधीश नितीन जीवने यांच्या हस्ते झाले. यावेळी नगर परिषद मुख्याधिकारी व देवस्थान ट्रस्ट सचिव श्रिया देवचके यांसह विश्वस्त तृप्ती धारणे, भूषण अडसरे, संतोष कदम, प्रशांत गायधनी, सत्यप्रिय शुक्ल, दिलीप तुंगार यासह वतनदार, तुंगार मंडळी ट्रस्टचे विश्वस्त व सदस्य, देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. या अगरबत्ती विक्रीतून मिळणाऱ्या राॅयल्टीतील पन्नास टक्के रक्कम देवस्थान ट्रस्टच्या लोकहितार्थ कामांसाठी योगदान म्हणून देईल, असे तुंगार मंडळी ट्रस्टने जाहीर केले. दिलीप तुंगार यांनी प्रास्ताविक, तर प्रदीप तुंगार यांनी आभार मानले. निर्माल्य अगरबत्ती त्र्यंबकेश्वर मंदिराजवळच्या संजय नार्वेकर यांच्या दुकानात उपलब्ध केली आहे.
वेळुंजेत उभारला प्रकल्प
एकदा वाहिलेली फुले काढून ती गायत्री मंदिराच्या बाजूस टाकली जातात. त्यांचा पुन्हा वापर केला जाणार नाही, यासाठी हे निर्माल्य यंत्राच्या सहाय्याने क्रश करण्यात येते. तयार झालेल्या सेंद्रिय पदार्थापासून अगरबत्ती तयार केली जाते. यासाठी पुणे येथील थर्ड वेव्ह टेक्नालॉजी ही संस्था अगरबत्ती आणि हवन पूजनात वापरले जाणारे साहित्य तयार करत आहे. संस्थेने या आधी अष्टविनायक पैकी तीन गणेश मंदिरांच्या निर्माल्यपासून अगरबत्ती तयार केली आहे. याव्यतिरिक्त देहू येथील निर्माल्य घेतले जाते. आता त्र्यंबकेश्वर मंदिराचे निर्माल्य घेऊन त्यापासून सुगंधित अगरबत्ती, धूप, हवन साहित्य तयार करण्यासाठी जवळच असलेल्या वेळुंजे येथे प्रकल्प उभारला आहे.
हेही वाचा :
- तळेगाव-चाकण महामार्गाला आले तळ्याचे स्वरुप
- Irshalwadi Landslide: इर्शाळवाडी दरड दुर्घटना ते मदतकार्य… : उपमुख्यमंत्री पवारांनी विधान परिषदेत दिली माहिती
- कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील निलजी बंधारा पाण्याखाली
The post त्र्यंबकराजाच्या निर्माल्यापासून अगरबत्ती, धूप ; पुजारी तुंगार ट्रस्टचा उपक्रम appeared first on पुढारी.