त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात संततधारेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी पहाटे अचानक तेलीगल्ली आणि मेनरोड परिसरात नीलगंगा आणि म्हातार ओहोळ या नाल्यांच्या पुराचे पाणी घुसल्याने रहिवाशांची झोप उडवली. या पुराने मेनरोड परिसरात सर्वत्र चिखल साचला. त्र्यंबकेश्वरला दिवसभरात 93 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
वशिष्ठा नदीस पूर असल्याने पिंप्रीजवळच्या पुलाच्या बाजूस असलेला रस्ता पाण्याखाली बुडाला. मुळेगाव रस्ता पुलाचा भराव वाहून गेल्याने प्रतिकेदारनाथ मंदिराकडे जाणारे भाविक खोळंबले. पहिने- म्हसुर्ली-घोटी रस्त्यावरच्या पुलावरून पाणी वाहत होते. पिंपळद- धुमोडी रस्त्यावर असलेल्या किकवी नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. इगतपुरी-घोटीमार्गे येणार्या बस बंद राहिल्या. पिंपळदच्या पुलावर पाणी असल्याने माळेगाव, ब—ाह्मणवाडे या गावांचा संपर्क तुटला. संततधारेने नाले, ओहोळांना पूर आलेला होता. सकाळच्या वेळेस जागोजागी पूल फरशी यावर पाणी असल्याने ग्रामीण भागातून येणारे दुग्धव्यवसायिक. भाजीपाला घेऊन येणारे शेतकरी त्र्यंबकेश्वरला पोहोचू शकले नाहीत. सोमवारी ग्रामीण भागातून येणार्या जाणार्या बहुतांश सर्व बस फेर्या बंद राहिल्या. वाघेरा घाटात दरड कोसळली. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एकचे उपअभियंता व्ही. पी. बाविस्कर आणि त्यांच्या पथकाने वेळीच धाव घेत वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केला. गणपतबारी येथे यावर्षीदेखील पावसाने सैल झालेले दगड, मुरूम यांचा भराव रस्त्यावर आलेला आहे.
हेही वाचा :
- पिंपरी : थेरगावातील दाम्पत्याला 37 लाखांचा गंडा
- नाशिक : नांदूरमध्यमेश्वरचे सर्व दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
The post त्र्यंबकला नदी-नाल्यांना पूर ; कुठे रस्ते पाण्याखाली तर कुठे दरडी कोसळल्या appeared first on पुढारी.