त्र्यंबकेश्वराला वज्रलेप, जाणून घ्या कशी असते प्रक्रिया…

त्र्यंबकेश्वर वज्रलेप,www.pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात. त्र्यंबकेश्वर मंदिरातील आद्य ज्योतिर्लिंगाची झीज होऊ लागली आहे. शिवलिंगाची झीज होत असून एका बाजूवरील वज्रलेप निघून चालला आहे.

वज्रलेप तसेच मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी गुरुवार दि. ५ ते  दि. १२ जानेवारी या कालावधीत मंदिर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. पुढच्या दोन दिवसांत आता वज्रलेपनाची काम पूर्ण होणार आहे. या कालावधीत भाविकांना मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. भाविकांना त्यामुळे दर्शन देखील घेता येणार नाही. त्याचबरोबर येथील गर्भगृहाला भाविकांनी भेट दिलेला चांदीचा दरवाजाही बसविला जाणार आहे. मंदिरातील गर्भ गृह पिंडीची, पाळची होत असलेली झीज थांबविणे व महादेवाच्या पिंडीचे संवर्धन व्हावे यासाठी भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत हे काम सुरु आहे. नवीन वज्रलेपनाच्या कामासाठी भाविकांना मंदिरात प्रवेश बंद असेल. मात्र प्रात:काल, माध्यान्ह आणि रात्रीची अशा त्रिकाल पूजा त्याच सोबत प्रदोषपुष्प पूजा सुरू राहतील, असे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

यापूर्वी कधी केला होता वज्रलेप?

पिंडीची झीज थांबविण्यासाठी यापूर्वी 21 फेबुवारी 2006 मध्ये वज्रलेप करण्यात आला होता. परंतु त्याचा काही अंश 16 सप्टेंबर 2022 ला निघाला होता. मागच्या वेळेस केलेला वज्रलेप घाईगर्दीत करण्यात आला होता. रात्री वज्रलेपनानंतर किमान पुढचे तीन दिवस त्यावर जल अर्पण करू नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला होता. मात्र, आठ तासांच्या आत जलाभिषेक करण्यात आल्याने वज्रलेप टिकला नाही.

अशी असते प्रक्रिया…?

मूर्तीची सातत्याने पूजा करून, त्यावर अभिषेक करून किंवा मूर्ती जुनी असेल, तर वर्षानुवर्षे बदलत राहणाऱ्या वातावरणाचा परिणाम होऊन दगडी मूर्ती झिजत जाते. अशी मूर्ती वज्रलेपाद्वारे पुन्हा तिच्या मूळ स्वरूपात आणता येणे शक्य आहे.

पूर्वी मेण आणि राळ वापरून वज्रलेपाची प्रक्रिया पूर्ण केली जायची आता मात्र, इफॉक्सी नावाच्या केमिकल आणि मोत्यांच्या भुकटीच्या साह्याने वज्रलेप दिला जातो. त्यानंतर मूर्ती अगदी नवी असल्यासारखी दिसू लागते. शिवाय तिची झीज झालेली देखील दिसत नाही. मूर्ती न बदलता तिचे पुनरुज्जीवन करण्याचा हा उत्तम मार्ग आहे.

मू्र्ती आणि मंदिरांची काळाच्या ओघामध्ये झीज होते. त्या मूर्ती पुन्हा त्यांच्या मूळ स्वरुपात दिसाव्यात, यासाठी वज्रलेप केला जातो. काही मोजक्याच मूर्तीकारांना वज्रलेपाची कला अवगत आहे. पुरातत्व विभागातर्फे त्र्यंबकेश्वराला वज्रलेप केला जात आहे.

The post त्र्यंबकेश्वराला वज्रलेप, जाणून घ्या कशी असते प्रक्रिया... appeared first on पुढारी.