त्र्यंबकेश्वर प्रकरण : ‘त्या’ चौघा तरुणांवर गुन्हा दाखल

त्र्यंबकेश्वर,www.pudhari.news

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर एका धर्माच्या काही तरुणांनी धूप, आरती व फुले वाहण्याचा प्रयत्न करत हिंदू धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या व सामाजिक सलोख्यास तेढ निर्माण केल्याच्या कथित प्रकरणी चौघा तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, त्र्यंबकमधील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी स्वत: शहरात येत विविध समाजघटकांशी चर्चा केली. जिल्हा अधीक्षक शहाजी उमाप हे दोन दिवसांपासून तळ ठोकून तपास करत आहेत. दरम्यान, शहरातील वातावरण शांत असून, त्र्यंबककर त्यांच्या नियमित व्यवहारात मग्न आहेत.

पोलिसांनी या कथित प्रकरणाशी संबंधित आकिल युसुफ सय्यद, सलमान आकिल सय्यद, मतीन राजू सय्यद, सलीम बक्षू सय्यद या त्र्यंबकेश्वरमधील तरुणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. शनिवारी 13 मे रोजी रात्री नऊ वाजून 30 मिनिटांनी संदल मिरवणुकीने आलेल्या काही व्यक्तींनी मंदिरात जाण्याचा आग्रह धरला. या प्रकरणावर पडदा पडला असतानाही खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांनी हे प्रकरण तापवत ठेवल्याने तीन दिवसांनंतर मंदिर ट्रस्ट प्रशासनाच्या कर्मचारी रशवी आसाराम जाधव (वय 40) यांनी फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पोलिस निरीक्षक बिपीन शेवाळे तपास करत आहेत.

त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेशाची परवानगी नसताना मंदिरात जाण्याचा आग्रह धरल्याचा प्रसंग उघड झाल्यानंतर शनिवार रात्रीपासून याबाबत प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. रविवारी सायंकाळी देवस्थान ट्रस्ट आणि इतर 15 हिंदुत्ववादी संघटनांनी तक्रार अर्ज, निवेदन दिले. त्यानंतर हा प्रकार गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी याबाबत चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमणूक केली. तसेच दोषी असतील त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

बंदोबस्तात वाढ

दरम्यान, या घटनेचे सर्वदूर पडसाद उमटत आहेत. त्र्यंबकेश्वरला बुधवारी सकाळी 10 वाजता सकल हिंदू समाजाच्या वतीने मंदिर व पोलिस प्रशासन यांना जाब विचारण्यासाठी एकत्र जमा होण्याचे आवाहन सोशल मीडियात करण्यात आल्याने पोलिसांची कुमक वाढविण्यात आली आहे.

शनिवारी संदल मिरवणूक मंदिराच्या समोरून जात असताना विशिष्ट समाजाच्या काही व्यक्ती मंदिराच्या प्रवेशद्वारी आल्या होत्या. मात्र, सुरक्षारक्षकांनी त्यांना आत जाण्यास मज्जाव केला. त्यानंतर त्यांनी तेथे धूप लावला व परत माघारी गेले.

– भूषण अडसरे, विश्वस्त

 

गुलाब शाह वली बाबा यांच्या ऊरूस मिरवणुकीत संदल घेऊन जात असताना डोक्यावर टोपलीत फुलांची चादर असते. ती दर्गामध्ये चढवितात. मिरवणूक मंदिरासमोर येते तेव्हा आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पहिल्या पायरीवर उभे राहून त्र्यंबकेश्वरास धूप दाखवत असतो. ते येथील राजे आहेत, अशी आमची श्रद्धा आहे व अनेक वर्षांपासून ती सुरू आहे. यावर्षी आम्हाला पायरीवर जाण्यास मनाई केली. आम्ही तेथूनच माघारी फिरलो.

-सलिम सय्यद, गुलाब शाह वली बाबा

हेही वाचा :

 

The post त्र्यंबकेश्वर प्रकरण : 'त्या' चौघा तरुणांवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.