त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारी लावलेल्या ‘त्या’ फलकास आक्षेप

त्र्यंबकेश्वर मंदिर,www.pudhari.news

त्र्यंबकेश्वर जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

येथील कथित मंदिर प्रवेशाबाबत बुधवारी (दि. १७) हिंदुत्ववादी संघटनांनी त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेशद्वारी शुद्धीकरण केले आणि प्रवेशद्वारी नव्याने हिंदूंशिवाय प्रवेश नाही असा फलक लावला. याबाबत आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेने आक्षेप नोंदवत अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये कारवाईची मागणी केली आहे. याबाबत संघटनेचे पदाधिकारी यांनी गुरुवारी (दि. १८) त्र्यंबक पोलिस ठाणे आणि देवस्थान ट्रस्ट यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात त्र्यंबकेश्वर हे ठिकाण भारतीय संविधानाच्या ५ व्या अनुसूचीत येत असून अनुच्छेद २४४ खाली येथील भाग व त्र्यंबकेश्वर देवस्थान हे आदिवासींचे आद्यदैवत त्र्यंबकराज महादेव यांचे आहे. हे देवस्थान आदिवासींच्या सामाजिक, सांस्कृतिक, प्रथा, परंपरा, अस्तित्वाशी निगडित आहे. त्याचे सर्वच अधिकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आदिवासी समाजाकडेच राहिलेले आहेत. भारतीय संविधानाच्या ५ अनुसूचीतील आदिवासी अनुसूचित क्षेत्रातील सामाजिक सलोख्याचे वातावरण खराब करून समाजाची सामाजिक शांतता भंग केली केल्याचा आरोप करत पर्यटन व्यवसायावर असलेले आदिवासींचे रोजगाराचे साधन हिरावले जात असल्याचे म्हटले आहे. यास हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे व त्यांचे सहकारी, कार्यकर्ते, आचार्य तुषार भोसले जबाबदार असून त्यांचे व्हिडिओ तपासून ओळख पटवून त्यांच्यावर आदिवासी समाजाची सामाजिक शांतता भंग केल्या प्रकरणी व अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत व जाणीवपूर्वक सामाजिक तेढ निर्माण करत असल्याबद्दल गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३४२ व मा. सर्वोच न्यायालय यांच्या आदेशानुसार आदिवासी समाज हा हिंदू नाही. तर हिंदूंशिवाय मंदिरात जाण्यास सक्त मनाई हा फलक येथील मूळ भूमिपुत्र समस्त आदिवासी समाजाला त्यांच्या मूळ दैवत महादेवाची पूजा अर्चा दर्शन करण्यासाठी नाकारला आहे का, ही शंका उपस्थित होत असल्याचे म्हटले आहे.

फलक कोणाच्या आदेशाने लावला त्याचा तपास करून त्यांच्यावरही कडक करावी अशी मागणी केली आहे. तसेच प्रवेशद्वारावरील तो सूचनाफलक तत्काळ काढून टाकावा अशी मागणी संघटनेने केली आहे. निवेदनावर जिल्हाप्रमुख दिलीप गांगुर्डे, नाशिक शहराध्यक्ष शशिकांत मोरे, प्रवक्ते देवा वाटाणे, अशोक लहांगे, बाळू मामा झोले, विजू पुराणे, अशोक घागरे, विलास कोरडे, अशोक गोतरणे, बाळू गुंबाडे यांच्यासह पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

हेही वाचा :

The post त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारी लावलेल्या 'त्या' फलकास आक्षेप appeared first on पुढारी.