त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्रसाद विक्रेत्यांना ओम प्रमाणपत्र

त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा- येथे मंदिरांमध्ये अर्पण करण्यात येणाऱ्या प्रसादाचे पावित्र्य, सात्विकता आणि शुद्धता अबाधित राहावे, यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी पुढाकार घेत प्रसाद विकणाऱ्या दुकानांना ‘ओम प्रमाणपत्र’ वाटप करण्यात आले. या संस्थेचे प्रमाणपत्र रणजित सावरकर, अभिनेते शरद पोंक्षे, महंत अनिकेतशास्त्री जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वप्रथम भगवान त्र्यंबकराजाला अर्पण करण्यात आले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष विष्णू दोबाडे, पुरोहित संघाचे अध्यक्ष तथा विश्वस्त मनोज थेटे, विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल, गिरीजानंद महाराज आदी उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर मंदिरालगतच्या पेढेविक्रेत्यांना नाशिक पुरोहित संघ अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी आयाेजकांनी पत्रकारांशी बोलताना, देशात हलाल प्रमाणपत्र देण्यात येत आहे. त्याप्रमाणे यापुढे देशभरातील तीर्थक्षेत्री प्रसाद विक्री करणाऱ्यांना ओम प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हे प्रमाणपत्र ऐच्छिक आहे. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येईल. प्रमाणपत्रावर डिजिटल संकेतांक आहे. त्यामुळे त्याची नक्कल करता येणार नाही. देवासाठी व भक्तांसाठी प्रसाद खरेदी करताना तो पवित्र असावा, यासाठी हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. हिंदू धर्माला अपवित्र असलेल्या कोणत्याही अनिष्ट व अशुद्ध घटकांचा समावेश नसेल असा प्रसाद विक्रेते विक्री करतील, असे स्पष्ट करण्यात आले. यावेळी सनातन हिंदू धर्माच्या घोषणा देण्यात आल्या.

विक्रेत्यांमध्ये नाराजी

काही व्यावसायिकांनी या उपक्रमाबाबत नाराजी व्यक्त केली. सरकारच्या अन्न व औषधे प्रशासनाचे प्रमाणपत्र घेतलेले असताना आणखी दुसरे प्रमाणपत्र कशासाठी, असा सवाल उपस्थित करण्यात आला. तसेच भाविकांमध्ये या प्रमाणपत्राने भ्रम व्यक्त होण्याची भीती व्यक्त केली आहे. तीर्थक्षेत्री प्रसाद विक्री करत रोजीरोटी मिळवणाऱ्यांना वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे, अशी चर्चा सुरू होती.

दरवेळी त्र्यंबकच का?

गतवर्षी मे २०२३ मध्ये कथित धूप प्रकरणाने शहरात भिन्नधर्मीय नागरिकांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न बाहेरच्या व्यक्तींकडून झाला होता. यावेळीही बाहेरच्या व्यक्तींनी प्रसाद विक्रेत्यांना हलालविरुद्ध ओम प्रमाणपत्र असा धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरवेळी त्र्यंबकेश्वरची निवड का करण्यात येते, अशी चर्चा नागरिक करत आहेत.