त्र्यंबकेश्वर शहरातील रस्त्यांचा झाला चिखल

त्र्यंबकेश्वर,www.pudhari.news

त्र्यंबकेश्वर : शहरात भुयारी गटार योजनेसाठी रस्ते खोदल्यानंतर ते बुजवताना खोदलेल्या खड्ड्यांत केवळ माती लोटण्यात आली. यामुळे पाऊस सुरू झाला तसे या मातीचा चिखल झाला असून, ब्रह्मगिरीच्या पायऱ्यांकडे जाणाऱ्या रिंगरोडवर वाहने कशी चालवयाची, असा सवाल वाहनचालक विचारत आहेत.

रस्त्याच्या मधोमध गटारीसाठी तीन ते चार फूट रुंदीची चारी खोदली आणि आता तिथे चिखल साचला आहे. दुचाकीस्वार त्यात अडकून धडपडतात. चारचाकी वाहनांना नेमके या खड्ड्यांना चुकवायचे कसे तेच समजत नाही. अशात शनिवारी व रविवारी या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पर्यटकांची वाहने उभी केली जातात. यामुळे वाहतूक आणि रहदारीसाठी केवळ मधली चारी शिल्लक राहते. त्यामधून वाहन चालवणे किंवा पायी चालणे हे कसरतीचे ठरते आहे. त्र्यंबकेश्वर शहरात पर्यटनात वाढीसाठी केंद्र आणि राज्य शासन यांचे शेकडो कोटींची विकासकामे सुरू आहेत. मात्र येथे आलेल्या पर्यटकांना आणि परिसरातील रहिवाशांना वाहनांसाठी आणि पायी चालण्यासाठी रस्ता नाही, अशी वस्तुस्थिती आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

The post त्र्यंबकेश्वर शहरातील रस्त्यांचा झाला चिखल appeared first on पुढारी.