त्र्यंबक परिसरात 35 परदेशी विद्यार्थ्यांची तपासणी

त्र्यंबकेश्वर,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; त्र्यंबकेश्वर लगत असलेल्या शैक्षणिक संस्थामध्ये परदेशी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात सर्वाधिक विद्यार्थी आफ्रिकन देशांतील आहेत. मात्र या विद्यार्थ्यांविरोधात स्थानिक नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे त्र्यंबकेश्वर पोलिसांनी परिसरात राहणाऱ्या ३५ परदेशी विद्यार्थ्यांची घरझडती घेतली.

त्र्यंबकेश्वर परिसरालगत असलेल्या भागात अनेक परदेशी विद्यार्थी वास्तव्यास आहेत. मात्र हे विद्यार्थी बेशिस्त असून रात्री अपरात्री आरडा ओरड करणे, अंमली पदार्थांचा नशा करणे, भरदाव वाहने चालवणे, दमदाटी करतात अशा तक्रारी स्थानिक नागरिकांकडून होत्या. काही प्रकरणांमध्ये सोशल मीडियावरही स्थानिक व विद्यार्थ्यांचे वाद समोर आले होेते. परदेशी विद्यार्थ्यांकडून त्रास होत असल्याच्या तक्रारींत वाढ झाल्याने याची दखल त्र्यंबकेश्वर पोलिसांनी घेतली. विशेषत: या विद्यार्थ्यांकडे अंमली पदार्थ असल्याच्याही तक्रारी होत्या. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार, त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बिपीन शेवाळे यांच्या सुचनेनुसार पथकांनी महिरावणी परिसरात राहणाऱ्या ३५ परदेशी विद्यार्थ्यांच्या घरी अचानक भेट देत पाहणी केली. विद्यार्थ्यांकडील सामान, घराची झडती घेत आक्षेपार्ह वस्तू आढळतात का याची शहानिशा केली. मात्र या विद्यार्थ्यांकडेही काहीही आढळून आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

हॉटेल, लॉजचीही तपासणी

त्र्यंबकरोड लगत असलेल्या हॉटेल, लॉजमध्ये आक्षेपार्ह गोष्टी होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी अचानक या हॉटेल, लॉजचही तपासणी केली. ही तपासणी मोहिम नियमीत राबवली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : 

The post त्र्यंबक परिसरात 35 परदेशी विद्यार्थ्यांची तपासणी appeared first on पुढारी.