थंडीचा कडाका वाढला अन् कांद्याचे भाव गडगडले! शेतकऱ्यांना भरली हुडहुडी

नाशिक : थंडीचा कडाका वाढला असताना कांद्याच्या गडगडलेल्या भावाने शेतकऱ्यांना हुडहुडी भरली आहे. उमराणेत एका दिवसात उन्हाळ कांद्याच्या भावात क्विटंलला सरासरी एक हजार व नवीन लाल कांद्याच्या भावात ८०० रुपयांनी घसरण झाली आहे. सटाण्यात दिवसाला उन्हाळ आणि नवीन लाल कांद्याच्या भावात अनुक्रमे ७०० ते ८५० रुपयांची घट झाली. 

घसरणीचा ‘ट्रेंड’
कांद्याच्या आगारात दिवसाला उन्हाळच्या भावात लासलगाव आणि देवळ्यात ६००, तर मुंगसेमध्ये ७००, चांदवड आणि मनमाडमध्ये ४०० रुपयांची सरासरी भावात घसरण झाली. जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळ कांद्याच्या भावातील घसरणीचा ‘ट्रेंड’ राहिला. नवीन लाल कांद्याच्या भावाची हीच स्थिती राहिली. लासलगावमध्ये २००, मुंगसेमध्ये ६२५, मनमाडमध्ये १००, देवळ्यात २५०, पिंपळगावमध्ये ६११ रुपयांनी कमी भाव मिळाला आहे. उन्हाळ कांदा बाजारात येत असताना कांद्याची आयात झाली आणि भाव गडगडले. मात्र आता उत्पादक परदेशात कांदा शिल्लक नसल्याने आयात कांद्याची चर्चा काहीशी मंदावली आहे. पण दुसरीकडे मध्य प्रदेशातील कांद्याने जिल्ह्यातील कांद्याचा वांदा केला आहे. निर्यातबंदीमुळे देशांतर्गत बाजारपेठेत फारशी मागणी नाही हे मुख्य कारण कांद्याच्या घसरणीमागे आहे. 

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

शेतकऱ्यांचे विक्रीवर लक्ष केंद्रित 
उन्हाळ कांदा शेतकऱ्यांकडे किती शिल्लक आहे, याचा अंदाज अद्याप स्पष्ट झालेला नाही. त्याचवेळी शेतकऱ्यांनी कांदा विक्रीवर लक्ष केंद्रित केले आहे. पिंपळगाव बाजार समिती आवार गुरुवारी (ता.३) लाल व उन्हाळ कांद्याने ‘हाऊसफुल’ झाले. तीस हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. सकाळच्या सत्रात कांद्याच्या दराला घरघर लागली. जिल्ह्यातील बाजारपेठेत उन्हाळ कांद्याला आज मिळालेला क्विंटलचा सरासरी भाव पुढीलप्रमाणे असून (कंसात बुधवारी क्विटंलला मिळालेला सरासरी भाव रुपयांमध्ये) : येवला- दोन हजार १०० (दोन हजार ४००), नाशिक- दोन हजार ८०० (तीन हजार), लासलगाव- दोन हजार १०० (दोन हजार ८००), मुंगसे- एक हजार ८५० (दोन हजार ५५०), कळवण- दोन हजार ५०० (दोन हजार ६५१), चांदवड- दोन हजार १०० (दोन हजार ५००), मनमाड- दोन हजार (दोन हजार ४००), सटाणा- एक हजार ९५० (दोन हजार ८००), पिंपळगाव- दोन हजार ४०० (दोन हजार ७५१), देवळा- दोन हजार (दोन हजार ६००), उमराणे- एक हजार ८०० (दोन हजार ८००). 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

नवीन लाल कांद्याच्या भावाची स्थिती 
(आकडे क्विटंलला सरासरी रुपयांमध्ये) 

बाजारपेठ गुरुवारी बुधवारी (ता. २) 
लासलगाव २ हजार ९०० ३ हजार १०० 
मुंगसे २ हजार २५० २ हजार ८७५ 
मनमाड २ हजार ५०० २ हजार ६०० 
सटाणा २ हजार १५० २ हजार ८५० 
देवळा २ हजार ४०० २ हजार ६५० 
उमराणे २ हजार २०० ३ हजार 
पिंपळगाव २ हजार ८०० ३ हजार ४११