थंडीत धुके का पडते? धुक्याची निर्मिती कशी होते? जाणून घ्या…

दाट धुके, www.pudhari.news

गणेश सोनवणे : नाशिक पुढारी वृत्तसेवा 

सध्या गल्ली पासून दिल्लीपर्यंत धुक्याची चादर आणि सोशल मीडियावर धुक्याने होत असलेल्या अपघातांचे व शेती नुकसानीचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. कोल्ड शॉक म्हणजे अचानक तापमानात दहा डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त फरक पडल्याने भारतात शेकडो लोकांचे मृत्यू होत आहेत, कानपूर सारख्या ठिकाणी लोक उभ्या उभ्या कसे कोसळून गतप्राण झाले यांचे भयानक व्हिडिओ व्हायरल झाल्याने सरकारला गांभीर्याने दखल घेत टिव्ही चॅनल व सोशल मिडिया तसेच यूट्यूब आदींसाठी ‘प्रसारसंहिता’ जाहिर करावी लागली.  राष्ट्रीय व जागतिक अन्नसुरक्षा आणि अर्थव्यवस्था धोक्यात आणणा-या धुक्यावर उपायांची गरज गेली तीस वर्षांपासून हवामान संशोधन करणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्याकडून आम्ही शास्त्रशुद्ध माहिती जाणून घेतली आहे.

धुके म्हणजे काय?

धुके म्हणजे पाणी आणि बर्फाचे अत्यंत सुक्ष्म कणांचे तरंगते थर होय. धुके म्हणजे जमिनी लगत तरंगते ढगच होय. व्हीजिबिलीटी (VIZIBILITY) म्हणजे ‘द्दष्यता’ कमी करण्यास धुके कारणीभूत ठरते. ‘किमान एक किलोमीटर वरील द्दष्य न पाहता येण्यासारखी स्थिती म्हणजे धुके’ आहे. अशी शास्त्रीय भाषेत धुक्याची व्याख्या करता येते. दाट धुक्यात 50 मीटर अंतरावरील द्दश्य ही पाहणे कठीण होते अशी माहिती आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हवामान संशोधक व ढगफुटी तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिली.

थंडीत धुके का पडते?

थंडीत पाण्याच्या वाफेचे सांद्रीभवन म्हणजे कंडेंसेशन होऊन बारीक बारीक पाण्याचे थेंब व सूक्ष्म बर्फकण तयार होऊन हवेत तरंगतात त्यामुळे कमी तापमानास थंडीत धुके पडते. थंडीत हवेतील आर्द्रता शंभर टक्के झाली तरी धुके निर्माण होते. मात्र 95 टक्क्यापेक्षा कमी आर्द्रता असतांना देखील धुके पडू शकते. बाष्पाचा मुबलक पुरवठा असतांना पाण्याचा गोठण बिंदू आणि वातावरणाचे तापमान यात ढोबळमानाने अडीच डिग्री सेल्सिअस इतका तापमानातील फरक आढळल्यास धुके निर्मितीस अनुकूल स्थिती तयार होते. थंडीत धुके पडण्या मागचे हेच कारण होय असेही भौतिकशास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.

धुक्याची निर्मिती कशी होते?

मुबलक पाणी आणि त्याचे बाष्पीभवन होण्यासाठी लागणारे तापमान, वा-याची स्थिती अशा अनेक गोष्टींवर धुके अवलंबून असते. धुक्यासाठी बाष्पाचा पुरवठा हा जवळचा समुद्र, नदी, तलाव, ओढा किंवा तळ्यातील पाण्यापासून होतो. अनेकदा सुर्याची उष्णता देखील जमिनी पर्यंत पोहचण्यास दाट धुके हे अडथळा ठरते. ढगाळ वातावरणात दिवसा धुक्याची चादर अनेकदा पसरते. दहा-पंधरा डिग्री सेल्सिअस तापमानात देखील धुके पसरते दिसून येते.

धुक्याचे प्रकार कोणकोणते आहेत?

थंडीच्या दिवसांत रात्री आकाश निरभ्र असते, तेव्हा जमिनीने दिवसभरात मिळविलेली सूर्याची ऊर्जा वातावरणात परत जाते. या ऋतूत दिवसापेक्षा रात्र मोठी आणि सर्व ऊर्जा परत गेल्यामुळे जमिनीचे तापमान आणखीनच घटते. जमिनीलगतच्या हवेचे तापमान दवबिंदूपेक्षाही कमी होते. इथली हवा बाष्पसंपृक्त होते आणि धुक्‍याचा दाट थर तयार होतो. अशा धुक्‍याला प्रारण धुके (Radiation fog) म्हणतात. थंडीच्या दिवसांत बाष्पयुक्त हवा डोंगराच्या वाताभिमुख बाजूवर उताराला अनुसरून वर सरकते आणि हळूहळू थंड होऊन थोड्या उंचीवर धुके तयार होते. यास ऊर्ध्वउतार धुके (Upslope fog) म्हणतात. सह्याद्रीच्या कोकणाकडील उतारावर असे धुके आढळते. ते बऱ्याच मोठ्या भूभागावर बराच काळ टिकते. थंड प्रदेशावरून वाहणारी उबदार हवा सांद्रीभवन पातळीला एकदम थंड होते तेव्हा उर्ध्वगामी धुके (Advection fog) तयार होते. स्थानपरत्वे या धुक्‍याचे किनारी धुके (Coastal fog), हिमधुके (Ice fog) आणि उर्ध्वगामी प्रारण धुके (Advection Radiation fog) असे प्रकार पडतात. थंडीच्या दिवसांत तापमान नीचांकी असते, तेव्हा थोड्याशा उबदार जलाशयावर थंड आणि उष्ण हवेचे मिश्रण होऊनही धुके बनते. याला बाष्प धुके (Steam fog) म्हणतात. आर्क्‍टिक समुद्रावर असे धुके खूप मोठा प्रदेश व्यापते. आर्क्‍टिकवर याला आर्क्‍टिक समुद्र धूम्र (Arctic sea smoke) म्हणतात असे शास्त्रीय विश्लेषण प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.

या सर्व प्रकारच्या धुक्‍यातील जलकणांचा व्यास दहा मायक्रोमीटर एवढा असतो. धुक्‍यातील एक घन सेंटीमीटर भागात असे शंभर जलकण असतात. लहान जलकण नेहमीच बराच काळ तरंगत राहतात. हजार मीटरपेक्षाही कमी दृश्‍यता हे कुठल्याही प्रकारच्या धुक्‍याचे महत्त्वाचे लक्षण समजण्यात येते. धुके तयार होण्यासाठी अतिसूक्ष्म जलकणांची निर्मिती गरजेची असते. ज्याभोवती ही क्रिया घडू शकते असे कण विविध कारणांनी उपलब्ध होत असतात. जंगलातील वणवे, ज्वालामुखीचा उद्रेक, मातीची धूप, क्षारयुक्त जलकण, धूर या सर्वांतून जलकणांचे समुच्चय निर्माण होण्यासाठी सूक्ष्म केंद्रिका उपलब्ध होतात. काही केंद्रिका (Nuclei) या जलाकर्षक (Hygroscopic) असतात. समुद्र किनाऱ्याजवळच्या फुटणाऱ्या लाटातील क्षार जलाकर्षक असतात. अशा कणाभोवती लगेचच सांद्रीभवन होऊ शकते असे ही वैज्ञानिक स्पष्टीकरण प्रा. किरणकुमार जोहरे यांनी दिले.

ज रियल टाइम व अक्षांश रेखांशनुसार दर दहा सेकंदाला अपडेट होणारी वेदर अलर्ट व इन्फोर्मेशन लवकरच मोबाईलवर ‘अधिकृत’ उपलब्ध होईल आणि त्यात धुक्याचा देखील ‘वार्निंग’ मिळू शकेल अशी माहिती प्रा. किरणकुमार जोहरे यांनी दिली.

हेही वाचा :

The post थंडीत धुके का पडते? धुक्याची निर्मिती कशी होते? जाणून घ्या... appeared first on पुढारी.