थंडी परतली; द्राक्षपंढरी हबकली! निफाडला ७.२ अंश नोंद 

निफाड/कसबे सुकेणे : द्राक्षकाढणी हंगामास महिनाभर उशिराने सुरवात झालेली असतानाच निफाडसह तालुकाभरात शनिवार (ता. ६)पासून कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. तालुक्यातील कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रात रविवारी (ता. ७) पारा ७.२ अंशांवर येऊन स्थिरावला. द्राक्षपंढरी समजल्या जाणाऱ्या उगाव परिसरात पारा आठ अंशांवर होता. या थंडीमुळे चालू हंगामात द्राक्षबागायतदारांना दुसऱ्यांदा‌ मोठा दणका बसला आहे. 

निफाडला ७.२ अंश नोंद; चालू हंगामात दुसऱ्यांदा दणका 
द्राक्षबागा परिपक्व अवस्थेत असताना आलेल्या थंडीच्या लाटेत द्राक्षमण्यांची फुगवण थांबली होती, तर बहुतांश ठिकाणी द्राक्षमण्यांना तडे जाऊन सरासरी १० टक्के नुकसान झाले होते. आता द्राक्षबागांतील द्राक्षघड परिपक्व झाले आहेत. त्यातच सकाळी व सायंकाळी थंडी अन्‌ दिवसा कडक उन्हामुळे द्राक्षमण्यांना तडे जाणे, तसेच उकाड्यासारखे संकट उभे ठाकले आहे. एकूणच द्राक्षपंढरीत हंगामाची सुरवात अन्‌ थंडीची लाट एकाच वेळी आल्याने द्राक्षपंढरी हबकली आहे. दरम्यान, रब्बीतील गहू, हरभरा व कांदा या पिकांमध्ये जोम नव्हता. मात्र, आता पारा घसरल्याने या पिकांना दिलासा मिळाला आहे. 

हेही वाचा- रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा

निफाड तालुक्यात सर्वत्र द्राक्षमाल परिपक्व झाला आहे. काही ठिकाणी द्राक्ष काढणीलादेखील सुरवात झालेली आहे. काही बागांमध्ये गोडवा निर्माण झाला आहे. या थंडीमुळे अशा परिपक्व द्राक्षमण्यांना तडे जाऊन धोका निर्माण होऊ शकतो. थंडी पुन्हा परतल्याने द्राक्षबागांचे नियोजन मात्र कोलमडले आहे. 
-बाबूराव सानप, द्राक्ष उत्पादक, सोनेवाडी‌ खुर्द 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच 

यंदा थंडीच नसल्याने रब्बी पिकांना धोका निर्माण झाला असून, उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. मात्र, आता काही प्रमाणात थंडी वाढली असल्याने उशिराच्या रब्बी पिकांना मोठा फायदा मिळेल. -प्रवीण जाधव, अध्यक्ष, पाणीवाटप संस्था, कसबे सुकेणे