थंडी सुरू होताच सायकलपटूंमध्ये जोश; पहाटे सायकलवर फिरणाऱ्यांची संख्या दुप्पट

झोडगे (नाशिक) : थंडीची चाहूल लागताच घरात ठेवलेल्या सायकली रस्त्यावर धावू लागल्या आहेत. आरोग्य संवर्धनासह हौसी सायकलपटूंमध्ये नवचैतन्य संचारले आहे. कोरोनामुळे सर्वांचेच आरोग्य धोक्यात आल्याने नागरिक दक्ष झाले आहेत. प्रत्येकजण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत आहे. हिवाळ्यात व्यायामासाठी तरुणाईसह नागरिकांचा सायकलिंगकडे मोठ्या प्रमाणावर कल वाढला असून, सद्यःपरिस्थितीत भल्या पहाटे सायकलवर फिरणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. 

दैनंदिन जीवनात सायकलचा वापर आजही मोठ्या प्रमाणावर होतो. अनेक स्थापित क्लब किंवा फाउंडेशनतर्फे महिन्यातील विशिष्ट दिवशी सायकलींवर पर्यटन केले जाते. अनेक उच्चभ्रू तसेच मध्यमवर्गीयही सायकलीच्या प्रेमात पडले आहेत. कोरोना काळात आरोग्य संपदा टिकवून ठेवण्यासाठी सायकलींचा फंडा गावागावांत राबविला जात आहे. महामार्गावर धुळे ते झोडगेदरम्यान रोज शेकडो सायकलींची भल्या पहाटेपासून वर्दळ दिसते. थंडीचा कडाका वाढताच यात आणखी वाढ होईल. व्यायामासाठी साध्या ते उच्च प्रतीच्या सायकलींचा वापर होत आहे. 

हेही वाचा>> नात्याला काळिमा फासणारी घटना! अल्पवयीन मुलीवर बापाकडून अत्याचार; मुलाला जन्म दिल्याने प्रकार उघडकीस

 
बाजारातील सायकलींच्या किमती 

साधी सायकल : पाच ते सात हजार 
रोड सायकल : पंधरा ते पन्नास हजारांपर्यंत 
माउंटन सायकल : दहा हजार ते दोन लाखांपर्यंत 
हायब्रीड सायकल : दहा हजारांपासून अडीच लाखांपर्यंत 
ट्रॅक सायकल : एक लाख ते पाच लाखांपर्यंत 

हेही वाचा>> खोदकाम करतांना सापडली सोन्याची घागर? बघायला गाव झाले गोळा; प्रत्यक्षात मात्र वेगळाच प्रकार

 

मानसिक, शारीरिक आरोग्यासाठी व्यायामाची गरज असल्याने त्यासाठी सायकलींवर भर दिला जात आहे. सायकलींगमुळे पर्यटन विकास, स्पर्धात्मक खेळ, आरोग्य, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रांत बदल झालेला दिसतो. सर्व वयोगटातील नागरिकांनी आरोग्यासह पर्यावरण संवर्धन रक्षणासाठी सायकलीचा वापर वाढवावा. 
-प्रा. लहानूताई जाधव, संचालिका, एसपीएच महिला महाविद्यालय, मालेगाव 

सायकलिंगमुळे शरीर फिट व चपळ बनते. सायकल चालविण्यासारखा दुसरा चांगला व्यायाम नाही. वातावरण स्वच्छ ठेवण्यासही सायकलिंगमुळे हातभार लागतो. गुडघे आणि सांध्याच्या समस्येपासून मुक्तता मिळण्यास मदत होते. हृदय व मनाशी संबंधित बऱ्याच समस्या कमी करण्यासाठीही सायकलिंग प्रभावी माध्यम आहे. 
-डाॅ. पुरुषोत्तम राठी बालरोग व सायकलिस्ट, स्टेशन रोड, धुळे