थकबाकीदारांनो! मार्चपासून जप्ती मोहीम सुरू; डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध होणार 

नाशिक : महसूल वाढीसाठी महापालिकेने सुरू केलेल्या अभय योजनेत शास्तीच्या रक्कमेमध्ये १५ जानेवारीपर्यंत ७५ टक्के, १५ फेब्रुवारीपर्यंत ५० टक्के, तर २८ फेब्रुवारीपर्यंत २५ टक्के सवलत दिली जाणार आहे. त्यानंतर थकबाकी अदा न करणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीची मोहीम १ मार्चपासून सुरू केली जाणार असल्याची माहिती कर उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी दिली. त्याचबरोबर पुणे महापालिकेच्या धर्तीवर करदात्यांना पेटीएम, वॉलेट, भीम ॲप सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

मार्चपासून थकबाकीदारांवर जप्ती मोहीम 
कोरोनामुळे महापालिकेच्या वसुलीवर परिणाम झाला आहे. डिसेंबरअखेरपर्यंत घरपट्टीतून ९४ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत अवघे पन्नास टक्के वसुली झाली आहे. त्याचबरोबर साडेतीनशे कोटी रुपये थकबाकी झाली आहे. थकबाकी अदा करण्यासाठी महापालिकेने अभय योजना लागू केली. परंतु त्यातून अवघे २२ कोटी रुपये प्राप्त झाले. पुणे महापालिकेने मात्र बिकट परिस्थितीमध्ये तेराशे कोटी रुपये वसुली केली आहे.

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

महापालिकेच्या केंद्रांवर पट्टी भरण्यासाठी येण्याऐवजी पेटीएम, वॉलेट, भीम ॲप या डिजिटल पेमेंटच्या सुविधा उपलब्ध करून दिल्याने पुणे महापालिकेला उद्दिष्ट गाठता आले. त्यामुळे नाशिक महापालिकेकडून देखील डिजिटल पेमेंटचा आधार घेतला जाणार आहे. पुढील आर्थिक वर्षापासून नाशिककरांना डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध होईल. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

करदात्यांसाठी एसएमएस सुविधा 
घरपट्टी देयके ग्राहकांपर्यंत पोचत नसल्याने महसूल वसुलीच्या उद्दिष्टांवर परिणाम होत असल्याने आता ग्राहकांना एसएमएसद्वारे घरपट्टी भरण्यासाठी सूचित केले जाणार आहे.