थरारक! रात्रभर गॅस गळती, पंख्याचे बटण दाबताच; थोडीशी निष्काळजी अन् घडला प्रकार

जुने नाशिक : रोजीरोटीसाठी ते सात जण भाड्याच्या खोलीत राहत होते. सोमवारची रात्र जणू काळ रात्रच बनून आली होती. रात्रभर गॅस गळती होत होती. त्यांचा मात्र लक्षात आले नाही. खोली छोटी असल्याने गॅस खोलीभर कोंडला गेला. जास्त वास येऊ लागल्याने त्यातील एकाने फॅनचे बटण बंद केले अन् तिथंच झाली चूक...अन् क्षणातच

अशी आहे घटना

सकाळची वेळ... गॅस सिलिंडरची गळती होऊन स्फोट झाल्याची घटना मंगळवारी (ता. १) भारतनगर परिसरात घडली. रोजगारनिमित्ताने मुज्जफरपूर (बिहार) येथील सात युवक भारतनगरमध्ये एका खोलीत वास्तव्यास होते. त्यांच्या घरात असलेल्या गॅस सिलिंडरला गळती लागून मंगळवारी सकाळी स्फोट झाला. सिलिंडरच्या रेग्युलेटरजवळ गळती होत असल्याचे युवकांच्या लक्षात आले नाही. सोमवारी (ता. ३०) रात्रभर सिलिंडरमधील गॅस लिक होऊन संपूर्ण घरात पसरला. या वेळी खोलीतून गॅस बाहेर पडण्यासाठी जागा नसल्याने तो खोलीतच जमा झाला. सकाळी त्यातील एकाने घरातील पंखा बंद केला असता. बटणातून बाहेर पडणाऱ्या स्पार्कने गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात घरात असलेले चौघे आणि घराच्या बाहेर खेळत असलेले तिघे भाजून जख्मी झाले.

अक्षरशः घराची एक भिंत पडून घराबाहेर

शोऐब अन्सारी, अमजद अन्सारी, नासिर अन्सारी, मुर्तुजा अन्सारी, कुतबुद्दीन अन्सारी, अफजाब अन्सारी, आसिफ अन्सारी अशी जख्मींची नावे आहेत. स्फोटात घरातील सर्व सामानाचे नुकसान झाले. स्फोट इतका भयंकर होता, की अक्षरशः घराची एक भिंत पडून घराबाहेर पार्क असलेल्या दुचाकी वाहनांचे देखील नुकसान झाले. स्फोटाची माहिती समजताच मुंबई नाका पोलिस आणि अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाले.

जख्मी युवकाचे धाडस

गॅसगळती स्फोटामध्ये जख्मी झालेले सात युवकांची गंभीर परिस्थिती होती. तरीदेखील त्यांनी धाडस करत स्वत:चा जीव वाचविण्यासाठी परिसरात असलेल्या रिक्षात बसून जिल्हा रुग्णालय गाठले.