थेट सरपंचावरील अविश्वास आमसभेत मंजूर; दाभाडी ग्रामपंचायतीवर पुन्हा भगवा 

दाभाडी (नाशिक) : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंचांच्या बहुचर्चित अविश्वास निवडणुकीत ठरावाच्या बाजूने जनतेने कौल दिल्याने सरपंच चारुशीला निकम यांचा एक हजार २७२ मतांनी पराभव झाला. यामुळे दाभाडी ग्रामपंचायतीवर पुन्हा भगवा फडकला. 

सकाळी सातपासून गुप्तमतदान

दाभाडी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच चारुशीला निकम यांच्याविरोधात १४ विरुद्ध दोन मतांनी ग्रामपंचायत सदस्यांनी जिंकलेला अविश्वास ठराव नव्या नियमानुसार आमसभेत मांडण्यात आला. त्यानंतर सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. बुधवारी (ता. २५) सकाळी सातपासून गुप्तमतदानासाठी मतदारांनी नावनोंदणी करण्यासाठी मोठी गर्दी केली. सकाळी दहापर्यंत तब्बल पाच हजार ३४२ मतदारांनी नोंदणी केली. दुपारी अकराला नोंदणीपात्र मतदारांपैकी पाच हजार ४३ मतदारांनी हक्क बजावला. यानंतर तत्काळ मतमोजणी घेण्यात येऊन अविश्वास ठरावाच्या बाजूने तीन हजार ४९, तर विरोधात एक हजार ७७७ मते मिळाली. यात २३९ मते बाद झाली. यामुळे एक हजार २७२ मतांनी ठराव फेटाळला गेला. ग्रामपंचायतीवर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकला आहे. 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

मतमोजणी विजयी गटाकडून मिरवणूक

या निवडणुकीत दावेदारांनी आरोप-प्रत्यारोपांनी रान उठविले. स्थानिक राजकीय कुरघोडीत तालुक्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लावल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. तालुक्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतीत अविश्वास ठरावाच्या विरोधात ‘त्रिकोण’, तर बाजूने ‘वर्तुळ’ या मतदान चिन्हांवर ही निवडणूक रंगली. मतदान व मतमोजणी शांततेत पार पडल्यावर सदस्य गटाकडून मिरवणूक काढून विजयी सभा घेण्यात आली. या वेळी डॉ. एस. के. पाटील, प्रमोद निकम, अशोक निकम, दिलीप निकम, नितीन निकम, नीलकंठ निकम, ज्ञानेश्वर निकम, अमोल निकम यांनी मनोगत व्यक्त केले. अक्षय निकम यांनी आभार मानले. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

प्रथमच राजकीय क्षितिजावर तिसरा कोन 

येथील ग्रामस्थांनी ‘प्रस्थापित विरुद्ध विस्थापित’ अशी पारंपरिक राजकीय लढाई गली अनेक दशके अनुभवली. मात्र या परंपरेला छेद देत प्रथमच येथील राजकीय क्षितिजावर तिसरा कोन उदयास येऊन त्यावर झालेले शिक्कामोर्तब या निवडणुकीचे आगळे वैशिष्ट्य ठरले. ग्रामपंचायत सदस्यांची फाटाफूट, गटातटाचे राजकारण, एकसंधतेला तिलांजली, परंपरेला छेद या वैशिष्ट्यांमुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे.