दराडेंची गुगली अन् शिंदेच्या बाउन्सरवर भुजबळांचा षटकार! एकाच व्यासपीठावर रंगली जुगलबंदी

नाशिक/येवला : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीत छगन भुजबळांसमोर उमेदवारी मागणारे आणि ती न मिळाल्याने नाराज होत थेट भुजबळांविरोधात शिवसेना उमेदवाराची धुरा सांभाळलेले, दीड वर्षात तालुक्याच्या राजकीय पटलावरील ज्येष्ठ नेते ॲड. माणिकराव शिंदे व पालकमंत्री छगन भुजबळ हे तसे एकमेकांपासून आलिप्तच राहिले आहेत. मात्र शनिवारी (ता. २१) हे दोघे नेते एकत्र आले व अपेक्षेप्रमाणे रंगली ती शाब्दिक जुगलबंदी. 

भुजबळ-शिंदे एकाच व्यासपीठावर

खरेदी-विक्री संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय बाजरी-मका खरेदी केंद्राचे उदघाटन पालकमंत्री भुजबळांच्या हस्ते, तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद माणिकरावांना देऊन तालुक्यातील सर्व प्रमुख नेतेमंडळींना आमंत्रित करण्याचा निर्णय एकमताने घेतल्याने प्रदीर्घ काळानंतर भुजबळ-शिंदे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. तालुक्यातील भुजबळ, पवार, दराडे, शिंदे, बनकर हे प्रमुख नेते एकाच राजकीय व्यासपीठावर आल्यावर राजकीय जुगलबंदी, टोमणे, कलगीतुरा रंगला नाही, तर नवलच! जनतेतही याबाबत कमालाची उत्सुकता होती व हा सोहळा सर्वांच्या मनासारखा झालाही तसाच. 

दराडे बंधूंची गुगली, माणिकरावांचा बाउन्सर

खरेदी केंद्राच्या उदघाटन कार्यक्रमात माणिकरावांच्या हस्ते पालकमंत्री भुजबळांचा सत्कार होत असताना आमदार दराडे बंधूंनी भुजबळांचा हा सत्कार माणिकभाऊंनी पत्नी उषाताईंसोबत करावा, असा आग्रह धरून उषाताईंनाही सत्कारासाठी आमंत्रित करत राजकीय गुगली टाकत अनेकांना भुवया उचवण्यास भाग पाडले. पुढे बोलताना राजकिय डावपेचात माहीर असलेल्या माणिकरावांनी मी कुठल्याही पक्षात नसतांना संघाने कार्यक्रमाचे अध्यक्षपद देऊन माझा सन्मान केला, असा चिमटा काढला. तसेच भुजबळांनी लक्ष घातले, तर शेतकऱ्यांच्या वीजबिल थकबाकी निर्णयात बदल होईल, असा आशावाद व्यक्त केला. भुजबळांच्या कामांचे कौतुक करत विकासाच्या या प्रवाहामध्ये सर्व तालुका भुजबळांबरोबर निश्चित सहभागी आहे, याचा आनंद आहे, असे सांगत राजकीय बाउन्सरही टाकला. 

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

 
भुजबळांची फटकेबाजी... 

भाषणबाजी व वक्तृत्वशैलीत राजकीय पलटवार करण्यात निष्णात असलेल्या भुजबळांना उपस्थित असलेल्या दराडे-शिंदे यांच्या राजकीय अदृश्य युतीची चांगलीच जाणीव असल्याने भुजबळांनी प्रथम राजकीय फटकेबाजी व नंतर वडिलकीचा सल्लाही माणिकरावांसह इतर नेते मंडळींना दिला. माणिकरावांना कळलं असेल, मी निवडून आल्यावर किती फायदा होतो, अशी राजकीय फटकेबाजी भुजबळांनी करताच माणिकरावांनी ‘मान्य आहे साहेब; पण मला वैयक्तिक काही नको’, असे सांगत हल्ला परतवण्याचा प्रयत्न केला. 

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?

निवडणुका पार्श्वभूमीवर नेते एकत्र आल्याने उत्सुकता

माझ्याकडे विजेचे खाते नाही; पण वीजप्रश्न भुजबळ मार्गी लावतील, हा माणिकरावांचा माझ्यावरचा केवढा मोठा विश्वास! असा प्रतिचिमटा भुजबळांनी माणिकरावांना काढत कोरोना काळात जगाने सर्व गमावले तेथे तुम्ही आम्ही काय मिळवणार? कोरोनापासून जपणूक करा, असा वडिलकीचा सल्लाही भुजबळांनी याप्रसंगी दिला. आगामी काळात बाजार समितीसह पालिका व इतर संस्थाच्या निवडणुका असून, यापार्श्वभूमीवर हे प्रमुख नेते एकत्र आल्याने पाटाखालून बरेच पाणी वाहणार हे नक्की..! त्यात भुजबळ-शिंदे एकाच व्यासपीठावर येण्याची जशी उत्सुकता होती, तशी आता दबक्या आवाजात चिंताही सुरू झाल्याचे चित्र आहे.