दरोड्याच्या प्रयत्नानंतर होता फरारी; रात्री स्मशानभूमीतील धक्कादायक प्रकार

भुसावळ (नाशिक) : येथील रेल्वे हॉस्पिटल परिसरात गोळीबाराच्या अफवेदरम्यान दरोड्याच्या प्रयत्नात असलेला व तेव्हापासून फरारी असलेला भारत वाडेकर. वसूबारसच्या रात्री स्मशानभूमीत झोपलेला असताना त्याच्यासोबत घडला प्रकार. अन् नंतर घडले असे...

अशी आहे घटना

शहरात गेल्या ८ नोव्हेंबरला रेल्वे दवाखाना परिसरात गोळीबार झाल्याची अफवा पसरली होती. त्या वेळी पोलिस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व बाजारपेठचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी व कसून चौकशी केली. त्या वेळी त्यांना मुकेश बाविस्कर, पवन रामू सपकाळे  व भारत दिलीप वाडेकर (रा. हद्दीवाल चाळ)  हे दरोड्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी मुकेश बाविस्कर व पवन सपकाळे यांना अटक करून त्यांच्याकडून चाकू, फायटरसह अन्य हत्यारं हस्तगत केली होती. तर, भारत वाडेकर तेव्हापासून फरारी होता. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, भरत वाडेकर हा वसूबारसच्या रात्री स्मशानभूमीत झोपलेला असताना त्यास सर्पदंश झाला. मात्र, त्याकडे त्याने दुर्लक्ष केले. विषबाधा वाढत गेल्याने तो रविवारी (ता. १५) स्वत:हून गोदावरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. मात्र, उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात डॉ. श्रीकांत जाधव यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही नोंद शहर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे.