दलित पँथरच्या १०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश; अन्यायाबाबत प्रवेशकर्त्यांनी मांडल्या समस्या

नाशिक : शिवसेना नेते सुनील बागूल, वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांच्या उपस्थितीत दलित पॅंथर संघटनेच्या सुमारे शंभर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी रविवारी (ता. १७) शिवसेनेत प्रवेश केला. पक्ष संघटन वाढविण्यासाठी झटणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

सुमारे शंभर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीची जबाबदारी ओळखून निष्ठेने कार्य करावे. सामान्य नागरिकांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. नागरिकांवर अन्याय होत असेल, तर त्यांच्या मदतीस धावून जा. त्यांची अडचण कशी सोडविता येईल, याकडे लक्ष द्या, असे सुनील बागूल आणि वसंत गिते यांनी या वेळी सांगितले. प्रवेशकर्ते गंजमाळ भागातील रहिवासी आहेत. घरकुल योजनेतील घरांबाबत झालेल्या अन्यायाबाबत समस्या प्रवेशकर्त्यांनी मांडल्या. माजी महापौर विनायक पांडे त्या प्रभागाचे नगरसेवक असताना, सर्वांना घरकुलाचा लाभ मिळेल, यासाठी इमारती बांधण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रत्यक्षात महापालिकेने तेथे केवळ दोन इमारती उभारल्या.

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

हक्काची घरे मिळवून देण्यासाठी लढा

१८० घरे देण्यात आली आहेत. अन्य लाभार्थी आजही त्यापासून वंचित आहे. त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. त्यांना त्यांच्या हक्काची घरे मिळवून देण्यासाठी लढा उभारून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन पांडे यांनी दिले. सचिन बांडे, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच