दशक्रिया विधीला गर्दी करणे भोवले; इगतपुरी-टाके घोटीत दोघांवर गुन्हा

इगतपुरी (जि. नाशिक) : कोरोना महामारी संसर्गाचा वाढता धोका पाहता शासनाने साथीचा रोग नियंत्रणात यावा, याकरिता नियमावली ठरवून दिली असताना नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी टाके घोटी (ता. इगतपुरी) येथे दोघांवर गुन्हा दाखल झाला. 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सगळीकडे आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक उपायांची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. विवाहाला पन्नास, तर अंत्यविधीसह दशक्रिया विधीसाठी जेमतेम २० नागरिकांना परवानगी दिली आहे. असे असताना टाके घोटी येथील एका दशक्रिया विधीसाठी तीनशे ते चारशे नागरिकांची गर्दी झाल्याने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यात शनिवार (ता. २०) टाके घोटी येथे स्मशानभूमीजवळ नदीकाठी दशक्रिया विधी कार्यक्रमास सुमारे तीनशे ते चारशे लोकांनी गर्दी करून विधी सुरू असताना कोरोना संसर्गाच्या नियमावलीचे उल्लंघन होताना दिसून आले. या घटनेची तक्रार पोलिस हवालदार राजेंद्र चिंतामण चौधरी यांनी पोलिस ठाण्यात नोंदविली. 

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती

शासनाने ठरवून दिलेल्या लोकसंख्यापेक्षा अधिक गर्दी जमवून दशक्रिया विधी सुरू असताना समाजात संसर्ग पसरविण्याचे संभाव्य असतानादेखील जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशाला केराची टोपली दाखवून दशक्रिया विधी सुरू ठेवण्यात आला म्हणून साथीचा रोग प्रतिबंधित कायद्याप्रमाणे दोषींवर गुन्हा नोंद झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

 
मंगल कार्यालये, लॉन्स व गर्दीचे ठिकाणांवर गर्दी न करण्याचे निर्देश असताना काही लोक जाणीवपूर्वक मोठे कार्यक्रम घडवून समाजात साथीचे रोग पसरवित आहेत, अशा लोकांवर शासनाचे नियमांचे उल्लंघन केल्याने गुन्हे दाखल केले आहेत. नागरिकांनी याची दक्षता घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे. 
-दीपक पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक 
 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा