
लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे झेंडूच्या फुलांचे उत्पादनही घटल्याने यंदा दसऱ्याला झेंडूची फुले चढ्या दराने विक्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे अधिक मिळण्याची शक्यता आहे.
दसरा सणाला झेंड़ूच्या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व असते. घराला तसेच दुकानांना तोरण बांधणे, सजावट, वाहनांना तसेच अन्य महत्त्वाच्या वस्तूंना झेंडूच्या फुलांचे हार घातले जातात. त्यामुळे मागणी लक्षात घेता, विक्रीतून चांगली कमाई होईल, या आशेपोटी शेतकऱ्यांनी झेंडूची मोठ्या प्रमाणात लागवड केली. परंतु यंदा नाशिक जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम फूलशेतीसह झेंडूच्या फुलांच्या उत्पादनावर झाला आहे. कमी झालेल्या पावसामुळे झेंडूच्या फुलांचे उत्पादनात घट झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुका झेंडूच्या फुलांच्या उत्पादनात आघाडीवर आहे. निफाड, वैजापूर, येवला, दिंडोरी, वणी, कळवण या भागांत फूलशेती केली जाते. पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी झेंडूची केलेली लागवड पावसाअभावी उत्पादनात घट देणार आहे. परंतु बाजारात पुरेसा माल येणार नसल्याने ज्यांचे उत्पादन चांगले राहणार आहे, त्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
यंदा समाधानकारक पाऊस नसल्यामुळे सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदा लागवड कमी झाल्यामुळे झेंडूच्या फुलांच्या उत्पादनात घट झाली आहे. तसेच फुलांचा दर्जासुद्धा घसरला आहे.
राकेश चव्हाण, झेंडू उत्पादक शेतकरी, दरसवाडी
यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे फुलांचा पुरवठा कमी होत आहे. झेंडूला असलेली मागणी बघता झेंडूच्या फुलांची कमतरता भासणार आहे. तसेच कमी झालेल्या पावसामुळे फुलांचा दर्जासुद्धा घसरला आहे.
– राजाभाऊ होळकर, फूलविक्रेते, लासलगाव
हेही वाचा :
- ठाणे: खडवली नदीत उतरण्यापूर्वीच 3 मुले ताब्यात; कल्याणच्या एमएफसी पोलिसांचे कौतुक
- Devendra Fadnavis: राज्यात कंत्राटी भरती जीआर रद्द: देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
- Pune news : ’लालपरी’च्या मार्गदर्शक पाट्याच गायब; प्रवाशांचा उडतोय गोंधळ
The post दसऱ्याला झेंडू खाणार भाव, उत्पादन घटले appeared first on पुढारी.