दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कांदा मार्केट गजबजणार! कांद्याच्या दरांकडे शेतकऱ्यांचे लक्ष

नामपूर (जि. नाशिक) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोमवार (ता. ५)पासून कांदा, डाळिंब लिलाव व भुसार माल खरेदी मार्केट सुरू होणार आहे. दहा दिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, मार्चएंडमुळे राष्ट्रीयीकृत बँकांचे बंद असणारे व्यवहार, मजूर टंचाई, आर्थिक टंचाई आदी कारणांमुळे शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद होते. दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारपासून बाजार समितीचे आवार शेतकऱ्यांनी गजबजणार आहे. 

कांद्याची आवक वाढणार

जिल्ह्यातील बाजार समित्या बंद असल्याने शेतकऱ्यांकडे कांद्याचा साठा तुंबल्यामुळे बाजारात कांद्याची प्रचंड आवक होईल, असा प्राथमिक अंदाज आहे. त्या मुळे कांद्याचे दर कमी होतात की स्थिर राहतात, याकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. 

हेही वाचा - महिलांनो सावधान! तुमच्या फेक अकाऊंटवरून पुरुषांना ब्लॅकमेलिंग; सायबर भामट्यांचा नवा प्रकार

कांद्याच्या बियाण्यांत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक

सध्या मोसम खोऱ्यासह बागलाण तालुक्यात उन्हाळ कांदा काढणीचा हंगाम जोमाने सुरू आहे. यंदा कांद्याच्या बियाण्यांत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याने उन्हाळी  कांद्याऐवजी रांगडा कांद्याचे बी निघाल्याने मातीमोल भावाने कांदा विकण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय उरलेला नाही. त्या मुळे मार्च महिन्याच्या सुरवातीपासून बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. गेल्या पंधरवड्यात मोसम खोऱ्यात अवकाळी पाऊस व प्रचंड गारपीट झाल्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संबंधित कांदा साठविण्यास योग्य नसल्याने सोमवार (ता. ५)पासून बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होईल. 

हेही वाचा - देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडूनदेखील चिमुरडी सुखरूप

मास्क न लावल्यास २०० रुपयांचा दंड 

नामपूर परिसरासह मोसम खोऱ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी लिलावाप्रसंगी आपल्या चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल बांधणे आवश्यक असल्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. अन्यथा २०० रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. तसेच लिलावानंतर जमिनीवर पडलेला कांदा पुन्हा ट्रॉलीत भरण्याच्या लिलावाची तांत्रिक अडचण असल्यामुळे सोमवारपासून शेतकऱ्यांनाच आपला माल ट्रॅक्टरमध्ये भरावा लागणार आहे. त्या मुळे शेतकऱ्यांनी लिलावास येताना सोबत पाटी आणावी, आपल्या मालाची प्रतवारी करून माल विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीने केले आहे. 

कांदा उत्पादकांना किफायतशीर दर मिळावा, यासाठी प्रयोगशील शेतकरी, कृषी क्षेत्राचे अभ्यासक यांनी अभिनव चळवळ सुरू केली आहे. त्यानुसार एप्रिल महिन्यात टिकवण क्षमता असणारा उन्हाळ कांदा बाजारात न आणता केवळ रांगडा (लाल खरीप) कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे. एप्रिलमध्ये रांगडा कांद्यास उन्हाळ कांद्याने स्पर्धा केली तर दोन्हींचे नुकसान आहे. मे महिन्यात कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. प्रमुख उत्पादक राज्यांत उन्हाळ कांद्याच्या प्रतिएकरी उत्पादकतेत सुमारे २५ टक्क्यापर्यंत घट आहे.

 - दीपक चव्हाण, शेतमाल बाजारभाव अभ्यासक, पुणे