दातृत्वाला सलाम! भरकटलेल्या गतिमंद व्यक्तीचा १२ वर्षे सांभाळ; फेसबुकच्या किमयेमुळे पुनर्मिलन, पाहा VIDEO

सोयगाव (नाशिक) : गतिमंद असल्याने तो रत्नागिरीच्या गुहागर येथून भरकटला..आणि थेट पोहोचला ते मालेगावच्या कृष्णा हॉटेलवर..भुकेने व्याकुळ असलेल्या या वाटसरू माणसाप्रती माणुसकी दाखवत संवेदनशील असलेल्या किरण देवरे यांनी त्यास अन्न, वस्त्र दिले आणि निवाराही..निवारा देतांना तो एक - दोन दिवस नाही तर तब्बल एक तप म्हणजेच बारा वर्षे..आणि तोही कुटुंबातील एक सदस्य म्हणून..

मालेगाव तालुक्यातील मेहुणे गावी बारा वर्षापूर्वी शेतीच्या बांधावर एक आगंतुक थांबला. देवरे परिवाराने त्याला आसरा दिला.  कोकणातील गुहागर सोडून आलेली ही व्यक्ती देवरे परिवाराचा सदस्य बनून राहत होती. या गतिमंद व्यक्तीला त्याचं घर मिळवून देण्याची किमया सोशल मीडियाच्या बळावर साध्य झाली आणि एक तपापुर्वी हरवलेला बाप मिळाल्याने गुहागर येथील आग्रे परिवार अक्षरशः गहिवरला.. त्याची ही भावनिक कहाणी..

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

देवरे कुटूंबाचा मोठेपणा

बारा वर्षे पूर्वी मनमाड मालेगाव रस्त्यावरून पायी चालून बबन धोंडू आग्रे ही व्यक्ती भूक तहानेने व्याकुळ अवस्थेत वऱ्हाणे गावाजवळ असलेल्या कृष्णा हॉटेलजवळ पोहोचली. बऱ्याच वेळ होऊनही कोणाचेच त्यांच्याकडे लक्ष नव्हते. मात्र हॉटेल मालक किरण देवरे यांचे या आगंतुकाकडे लक्ष गेले. देवरे यांनी आग्रे यांची विचारपूस केली, मात्र त्यांना काहीच नीट सांगता येत नव्हते. देवरे यांनी त्याला हॉटेलवर जेवण दिले. दोन तीन दिवस ते हॉटेलवरच माणुसकीच्या भावनेने आसरा दिला. दरम्यान त्यांना गावचे नाव सांगता येत नव्हते. देवरे यांनी त्यांना मेहुणे येथील त्यांच्या घरी थांबवले. आग्रे शेतमळ्यात तसेच त्यांना आवडेल ते काम स्वतः हुन करू लागले. बघता बघता ते देवरे कुटुंबाचे सदस्यच बनले. बारा वर्षे त्यांनी मेहुणे येथे देवरे कुटुंबियांसोबत मुक्काम केला. 

फेसबुक च्या किमयेमुळे पुनर्मिलन ​

बारा वर्षात देवरे यांनी अनेक वेळा आग्रे त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेतला मात्र तो बहुतेकदा निष्फळ गेला. देवरे यांचे बंधू योगेश देवरे हे दिवाळीसाठी गावी आले असता त्यांनी सहजच आग्रे यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील गगोली गावी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांनी फेसबुकवरून आग्रे आडनाव असलेल्या व्यक्तींना संदेश पाठवला. त्यात योगायोगाने आग्रे यांच्या मुलांचे नाव शोधण्यास यश लाभले. आग्रे यांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती मिळाली व संपर्क झाला. संदेशाची देवाण घेवाण झाली. ओळख पक्की झाली आणि आग्रे परिवाराचा पित्याचा शोध फेसबुकच्या भिंतीवरून थेट घरात पोहचला. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

परिसरात अनोख्या भेटीची  चर्चा

काल (दि.२२) ला त्यांचे लहान बंधू, पत्नी व मुले सर्वजण त्यांना घेण्यासाठी आले  तब्बल बारा वर्षानंतर परिवाराचे सदस्य भेटल्याने सर्वांना गहिवरून आले. बारा वर्षे पित्याचा सांभाळ करणाऱ्या देवरे परिवाराचे कृतकृत्य भाव व्यक्त केला. दोन परिवारात सेवाव्रतातून आपलेपणाचा अनोखा सेतू बांधला गेला. आग्रे यांना अगदी आंनदाने ते आपल्या घरी रवाना झाले. तब्बल बारा वर्षांपासून हरवलेला बाप देवरे परिवाराच्या दातृत्वाने आणि फेसबुक च्या किमयेमुळे पुनर्मिलन शक्य झाले. या अनोख्या भेटीची आश्चर्य मिश्रित चर्चा परिसरात होत आहे.देवरे परिवाराच्या दातृत्वावर शाबासकीची थाप उमटते आहे.

गेल्या बारा वर्ष्यापूर्वी माझा मोठा भाऊ  घरातून निघून गेला होता. आम्ही त्याचा भरपूर शोध घेतला मात्र तो सापडला नाही मात्र किरण देवरे यांच्या कुटुंबीयांनी सोशील मीडिया द्वारे त्याचा तपस करत माझ्या भावाची व त्यांच्या मुलाची बारा वर्षांनंतरही भेट घडून आणली. त्यांनी बारा वर्षे त्याचा चांगला सांभाळ केला. त्यांचे उपकार आयुष्यभर विसरणार नाहीत. - गणपत आंग्रे, भाऊ