दादा भुसे यांच्यावर आता कोणती जबाबदारी येणार? ; जीव भांड्यात, पदाची उत्सुकता

दादा भुसे,www.pudhari.news

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठे बंड यशस्वी होताना पक्षांतर्गत हाडाचा शिवसैनिक आणि बंडखोर नेत्यांचे समर्थक अशी सरळ दुही निर्माण झाली आहे. गेल्या 10 दिवसांत उमटलेल्या प्रतिक्रियांमधून संबंधित गट अधोरेखित झाल्याचे राज्यभरात पाहायला मिळाले. त्यास मालेगावही अपवाद ठरले नाही. प्रारंभापासूनच्या धक्कातंत्राला साजेसा शेवट गुरुवारी (दि. 30) एकनाथ शिंदे यांची थेट मुख्यमंत्रिपदी वर्णी लागण्याने झाला आणि येथील शिवसेना संपर्क कार्यालयात फटाक्यांची आतषबाजी झाली. तेव्हा शिवसेनेतील जुन्या जाणत्या शिवसैनिकांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकवत लक्षवेधी आमदारांचा कंपू सोबत घेत गुवाहाटी गाठले होते. तेव्हापासून राज्याच्या राजकारणात भूकंपाचे धक्के बसत राहिले. एक – एक करत शिवसेनेचे आमदार शिंदे कंपूत सहभागी होत गेले. त्यात सर्वात शेवटच्या टप्प्यात कृषिमंत्री दादा भुसेही वळते झाले. तत्पूर्वीच्या नाट्यमय घडामोडीत त्यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केल्याचे वरकरणी दिसत राहिल्याने मालेगाव शहर व तालुक्यात एकनिष्ठतेचा झेंडा फडकत राहिला. मात्र, तेही नॉटरिचेबल होऊन बंडाच्या मार्गावर गेल्याने मात्र दुही निर्माण झाली. सोशल चावडीवर शिवसैनिक आणि भुसेसैनिक अशी विभागणी झाली. भुसे यांनीच नियुक्त केलेले शहरप्रमुख राजाराम जाधव, माजी महानगरप्रमुख रामा मिस्तरी, माजी तालुकाप्रमुख अ‍ॅड. संजय दुसाने, संपर्कप्रमुख प्रमोद शुक्ला आदी ज्येष्ठांनी आपण कट्टर शिवसैनिक अशी भूमिका मांडली. तर, ‘जिथे तुम्ही तिथे आम्ही’ या प्रवाहात माजी महापौर नीलेश आहेर, बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, युवासेनेचे विनोद वाघ, तालुकाप्रमुख मनोहर बच्छाव, शशी निकम, भरत देवरे आदींनी दादासाहेबच आपला पक्ष असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर एका ज्येष्ठ शिवसैनिकाने बुधवारी रात्री संपर्क कार्यालयाजवळ नाराजीनामा वाचल्याची चर्चाही रंगली.

10 दिवसांपासून सुरू नाट्यावर शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तूर्त पडदा पडला आणि त्यांचे खंदे समर्थक दादा भुसे यांच्यावर आता कोणती जबाबदारी येणार? कृषिमंत्रिपद कायम राहणार की, मोठे मंत्रालय मिळणार याविषयी कुतूहल निर्माण झाले.

हेही वाचा :

The post दादा भुसे यांच्यावर आता कोणती जबाबदारी येणार? ; जीव भांड्यात, पदाची उत्सुकता appeared first on पुढारी.