दामदुप्पट रकमेचे आमिष दाखवून पावणेतीन लाखांची फसवणूक 

मालेगाव (जि.नाशिक) : शहरातील कॅम्प शिवाजीनगर भागातील वृद्धेला दामदुप्पट पैसे मिळतील, असे आमिष दाखवत खोटे प्रमाणपत्र देऊन सुमारे दोन लाख ८६ हजार ७०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या ठकबाजी प्रकरणी कुमूद पगारे (वय ६२) यांच्या तक्रारीवरून देवीदास अहिरे यांच्यासह सात संशयितांविरुद्ध कॅम्प पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

खोटे प्रमाणपत्र देऊन घातला गंडा
२०११ ते १७ या काळात अहिरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी संगनमत करून श्रीमती पगारे यांच्याकडून रियल लाइफ ॲग्रो केटल प्रा. लि., रियल लाइफ क्रियेट्रअर्स इंडिया लि., तसेच एलआयसीआय डेव्हलपर्स लिमिटेड अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे संचालक व एजंट असल्याचे भासवून विश्‍वास संपादन केला. तसेच या कंपन्यांच्या योजनेत पैसे गुंतविल्यास ठराविक मुदतीनंतर दुप्पट पैसे मिळतील, असे आमिष दाखवत खोटे प्रमाणपत्र देऊन पगारे व त्यांच्या कुटुंबीयांकडून पावणेतीन लाख मिळविले.

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

न्यायालयीन आदेशानंतर छावणी पोलिसांनी श्रीमती पगारे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. यातील तिघे संशयित बाहुबलीनगर धुळे येथील, दोघे संशयित झोडगे येथील, तर एक संशयित देवारपाडे येथील आहे.